श्री माणिक प्रभू

श्री माणिक प्रभू
          श्री स्वामी समर्थ, नमस्कार स्वामी भक्तहो. आज आपण श्री दत्त गुरुंच्या चौथ्या अवतारा बद्दल जाणून घेणार आहोत. श्री माणिक प्रभू यांना श्री दत्त गुरुंचे चौथे अवतार मानले जाते.
          माणिक प्रभूंचा जन्म इ.सन १८१७ मध्ये कर्नाटकातील, कल्याणी तालुक्यातील लाडवंती या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मनोहर नाईक हरकुडे तर आईचे नाव बयम्मादेवी असे होते. त्यांचे वडील निस्सीम रामभक्त होते. श्री माणिक प्रभू यांनी लहान असतानाच आपण ईश्वरी अवतार असल्याची प्रचिती देण्यास सुरुवात केली होती. आयुष्यातील काही क्षण अनेक ठिकाणी फिरण्यात आणि चमत्कार करण्यात घालविल्या नंतर कर्नाटकातील हुमनाबादेजवळ एका निर्मणुष्य ठिकाणी वास्तव्य केले. सध्या ते ठिकाण माणिकनगर ह्या नावाने प्रसिद्ध आहे. त्यांच्या कार्यामुळे दत्त संप्रदायाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. पुढे १८६५ मध्ये जीवंत समाधी घेऊन आपले अवतार कार्य संपवले. 
           'सकलमत संप्रदाय' नावाने प्रसिद्ध असलेल्या, दत्त संप्रदायाची त्यांनी स्थापना केली. या संप्रदायात अनेक धर्मांच्या व पंथांच्या तत्वांचा समन्वय साधलेला आढळून येतो. सर्व देवता या एकरूप आहेत त्यामुळे विशिष्ट देवतेच्या मंत्रांचाच उच्चार केला पाहिजे, अशी या संप्रदायात अट नाही. या संप्रदायात आत्मा आणि चैतन्यत्व यांनाच ईश्वर मानले आहे. या संप्रदायात श्री दत्तात्रेयांसोबत मधुमती नावाच्या शक्तीची उपासना केली जाते. श्री माणिक प्रभूंना समन्वयवादी वृत्तीमुळे शैव, वैष्णव, लिंगायत इत्यादी हिंदू पंथच नव्हे तर मुस्लिम, शिख व पारशी धर्मीय लोकही पुज्य मानतात. माणिकनगरात दत्त जयंती सोबत मोहरम आणि जंगमांचा संक्रांत उत्सवही साजरा केला जातो. 
          श्री माणिक प्रभूंना अनेक भाषा अवगत होत्या. त्यांनी मराठी,कन्नड आणि हिंदी भाषेतील अनेक रचलेली पदे आणि आरत्या फार प्रसिद्ध आहेत. श्री माणिक प्रभूंनी मल्हारी माहात्म्य, आत्मरूपप्रतीती, संगमेश्वर महात्म्य, हनुमंत जन्म इत्यादी ग्रंथ रचले. श्री माणिक प्रभूंच्या अंगावर लहानपणापासूनच सोने व रत्ने असतं त्यामुळे रा. चिं. ढेरे यांनी श्री माणिक प्रभूंचा उल्लेख 'ऐश्वर्यसंपन्न राजयोगी' असा केला आहे. त्यांनी देणगीतून मिळालेल्या धनाचा स्वतःसाठी कधीच उपयोग केला नाही. त्या धनातून गोरगरीबांचे कल्याणच केलं. अनेक निराश आणि निराधारांचे ते आधार बनले. 
          श्री माणिक प्रभूंच्या समाधीनंतर त्यांच्या गादीवर जो कोणी बसत असेल त्या व्यक्तीस माणिक प्रभू म्हणुनच संबोधले जाते. आज श्री माणिक प्रभूंची गादी त्यांच्या भावाच्या वंशजांकडे आहे. त्यांमध्ये श्री मनोहर माणिक प्रभू आणि श्री मार्तंड प्रभू हे माणिक प्रभू फार प्रसिद्ध आहेत. श्री मनोहर माणिक प्रभूंनी अनेक ग्रंथ लिहिले व संप्रदायाची पुजा पद्धत निश्चित केली. 
          वरील माहिती ही रा. चिं. ढेरे लिखीत दत्त संप्रदायाचा इतिहास व इतर पुस्तके आणि इतर समाजमाध्यमांचा आधार घेऊन आपल्या पर्यंत पोहोचवली आहे. या संदर्भात तंतोतंत सत्यता असने अशक्य आहे. कारण अनेकांची मते ही वेगवेगळी असु शकतात. तर ही माहिती देऊन आपला निरोप घेतो. आणि पुन्हा भेटूया आणखी नव्या लेखाद्वारे तो पर्यंत

             श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ||
थोडे नवीन जरा जुने