श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय १६

श्री स्वामी चरीत्र सारामृत (मराठी अनुवाद) अध्याय  १६
          श्री स्वामी समर्थ, सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय सोळावा या बद्दल जाणून घेणार आहोत.
          श्री गणेशाला वंदन करून ग्रंथकार पुढील अध्याय कथन‌ करण्यास प्रारंभ करतात. भक्तजनांचे रक्षण करण्यासाठी साक्षात श्री दत्त यतीरूप घेऊन भूवरी प्रकट झाले. आणि श्री स्वामींनी अनेक वर्षे अक्कलकोटात वास केला. त्या काळी श्री स्वामींचे अनेक भक्त होऊन गेले पण त्यात सर्वश्रेष्ठ भक्त हे स्वामी सुत होते. 
          जो कोणी भक्त स्वामीसुतांचे हे चरित्र संपूर्ण श्रद्धेने श्रवण करील त्याचे सर्व महादोष लयास जातील, असे ठामपणे प्रतिपादन करून ग्रंथकार स्वामीसुतांचे चरीत्र कथन करीत आहेत. 
          त्या काळी हरीभाऊ नावाचे एक सद्गृहस्थ मुंबईत रहात होते. हे मराठा सद्गृहस्थ मुंबईस नोकरी साठी वास्तव्यास होते, परंतु त्यांचे गाव हे कोकणातील, तसेच राजापूर तालुक्यातील इटीया गाव हे होते. त्यांचे घर सुसंपन्न होते. आणि सोबत त्यांची आई आणि लहान भाऊ रहात होते. 
          मुंबई मध्ये असताना हरीभाऊंना एक पंडित नावाचा मित्र होता. दिवाळखोरी आल्यामुळे तो पार कर्जात बुडाला होता. असे असताना पंडितांना श्री स्वामीं विषयी समजते. तेव्हा मनात भाव धरुन पंडित श्री स्वामींना नवस करतात, की आठ दिवसात जर मी कर्जमुक्त झालो तर दर्शनाला अक्कलकोटला येईन. असे सात दिवस पालटले पण कोणतीच सुवार्ता मिळाली नाही. 
          आठवा दिवस उजाडला आणि जणू काही चमत्कारच झाला. हरीभाऊंचा आणखी एक मित्र कर्जबाजारी होऊन जीवनाला कंटाळला होता. त्या मित्राचे नाव गजानन असे होते. त्याने आपले सारे पैसे अफूच्या व्यापारातील शेअर्स मध्ये गुंतवले होते. शेअर्स घसरल्याने गजाननाला फार मोठे नुकसान झाले. 
          तेव्हा हरीभाऊ आणि गजानन पंडितांची भेट घेतात व सारी हकीकत पंडिताला सांगतात. तेव्हा पंडित म्हणतात मलाही फार कर्ज झाले आहे यात काही शंका नाही. आणि जर जप्ती आली तर आपल्या इज्जतीचे धिंडवडे निघतील. 
          पंडिताने एक युक्ती केली, त्या दोघांचे मालक आपण आहोत असे पेढीवर लिहून दिले. उभयतांनी ते मान्य केले आणि तेवढ्यात शेअर्सचे भाव वाढल्याची वार्ता त्या तिघांच्या कानी पडते. आणि त्यांचे सर्व कर्ज‌ फिटून ते श्रीमंत होतात. 
          तेव्हा पंडित हरीभाऊंना आणि गजाननाला श्री स्वामींना केलेल्या नवसाची हकीकत सांगतात. श्री स्वामींच्या कृपेनेच आपण कर्जमुक्त झालोत आणि आता आपल्याला श्री स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जायचे आहे, असे हरीभाऊला आणि गजाननाला सांगतात. आणि ते तिघेही श्री स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला येतात. 
         अक्कलकोटला आल्यावर तिघेही श्री स्वामींची भेट घेतात. श्री स्वामींचे दर्शन घेऊन ते भक्ती भावाने पुजन करतात. तेव्हा श्री स्वामी गजाननाला शिव, पंडिताला राम आणि हरीभाऊस मारूती अशी हाक मारून जवळ‌ बोलावतात. आणि त्या तिघांना मंत्र देऊन त्यांना पावन करतात. त्यांचे जीवन धन्य करतात.
        हरीभाऊला श्री स्वामींनी मंत्र दिला तो असा, ' गुरूर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा | गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवै नमः|| आणि त्याला‌ परमानंद होतो. तसेच गजाननालाही श्री स्वामी मंत्र देतात तो असा, 'आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरम् | सर्व देव नमस्कार: केशवं‌ प्रती गच्छति || आणि मंत्र ऐकून गजाननही आनंदी होतो. आणि तसेच पंडितालाही‌ जवळ बोलावून श्री स्वामी मंत्र देऊन पावन करतात, इद्मेव शिवम् इद्मेव शिवम् | इद्मेव शिवम् इद्मेव शिव: ||
          हरीभाऊ, पंडित आणि गजानन श्री स्वामींच्या दर्शनाला येताना सोबत तीनशे रूपये दक्षिणा घेऊन येतात. आणि याचे काय करावे म्हणून श्री स्वामींस विचारतात. तेव्हा श्री स्वामी त्या पैशांनी चांदीच्या पादुका बनवून आणण्याची आज्ञा करतात. 
          यातूनच हरीभाऊंना श्री स्वामींचा ध्यास लागतो. हरीभाऊ वारंवार अक्कलकोटला येऊ लागतात. श्री स्वामी सेवेत त्यांना परमानंद प्राप्त होत असे. 
          पुढे श्री स्वामी हरीभाऊंना आपला सुत मानू लागले. श्री स्वामींनी हरीभाऊंना आपला संसार आणि प्रपंच लुटवून घरावर तुळशीपत्र ठेवायची आज्ञा केली आणि भगवी वस्त्रे परिधान करण्यास सांगितले. हरीभाऊ तसे करतात आणि आपल्या पत्नीला पांढरी वस्त्रे देवून तिचे सर्व अलंकार दान करतात. पुढे श्री स्वामी आज्ञेनेच मुंबईतल्या सागर किनारी म्हणजेच गिरगावात मठाची स्थापना करतात. आणि स्वतःला मनोभावे श्री स्वामींच्या सेवेत रूजू करतात. 
          अशाप्रकारे ग्रंथकाराने स्वामीसुतांच्या चरित्राचे कथन करीत श्री स्वामी चरीत्र सारामृताच्या सोळाव्या अध्यायाची समाप्ती केली आहे. 
               श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ||


          थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना श्री स्वामी समर्थ||




थोडे नवीन जरा जुने