श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ

         श्री स्वामी समर्थ, नमस्कार स्वामी भक्तहो. आज आपण श्री दत्त गुरुंच्या पाचव्या अवतारा बद्दल जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ यांना श्री दत्त गुरुंचे पाचवे अवतार मानले जाते.
          श्री स्वामी समर्थ यांच्या जन्म तिथि बद्दल कुणालाच ज्ञात नाही. पण ते अश्विन महिन्यात ५ बुधवार १८५७ ला अक्कलकोट येथे आले. चैत्र शुद्ध २ हा श्री स्वामींचा प्रकट दिन मानला जातो. त्यांच्या आईवडिलांन बद्दलची काहीच माहिती नाही. त्यांचा कार्यकाल हा १८५६ ते १८७८ पर्यंतचा असून नेहमी ते दिगंबर अवस्थेत वावरत असत. त्यांच्या गुरुं बद्दलची काही नोंद नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांनी चैत्र वद्य १३ला १८७८ मध्ये अक्कलकोट येथे समाधी घेतली. बाळप्पा महाराज, चोळप्पा महाराज, आळंदीचे नृसिंह सरस्वती, रामानंद बीडकर हे त्यांचे शिष्य फार प्रसिद्ध आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांची श्री स्वामी लिलामृत, श्री गुरुलिलामृत इत्यादी चरित्र ग्रंथ प्रसिद्ध आहेत.श्री स्वामी समर्थ महाराजांचा श्री साईबाबा, शेगावचे गजानन महाराज, फलटणचे सद्गुरू हरीबाबा महाराज आणि श्री शंकर महाराज या संतांवर विशेष प्रभाव होता. 
          श्री स्वामी समर्थ हे दत्त अवतार परंपरेतील आणखी एक अवतार मानले जातात. दत्त संप्रदायात त्यांचे चौथे स्थान मानले जाते. श्री स्वामींनी आपला परिचय देताना आपण मुळ पुरुष वडाचं झाड, दत्त नगर वसतीस्थान आणि नृसिंहभान असे आपले नाव सांगितले. 
          आपल्या अवतार कार्याच्या समाप्ती वेळी श्री नृसिंह सरस्वती श्रीशैल्याहून कर्दळी वनात तपश्चर्येला गेले. तिथे त्यांनी साडे तीनशे वर्षे तपश्चर्या केली. तत्समयी त्यांच्या भोवती वारूळ‌ तयार झाले. एक दिवस एक लाकूडतोड्या झाड तोडण्यासाठी त्या वारुळा नजिक असलेल्या झाडावर कुर्हाडीने प्रहार करीत होता. झाड तोडत असताना त्याच्या कुर्हाडीचा घाव चुकून वारुळावर बसतो. व त्या वारूळातून श्री स्वामी प्रकट होतात. त्या लाकुडतोड्याचे नाव उद्धव असे होते. त्या कुर्हाडीचा घाव त्यांच्या मांडीवर स्पष्ट दिसतो. तेथून पुढे ते काशी क्षेत्रास गेले. तेथून कलकत्ता व जगन्नाथ पुरी मार्गाने गोदावरीस आले. अनेक नगरे फिरून मग ते मंगळवेढा येथे आले. तेथून पुढे पंढरपूर, मोहोळ, सोलापूर येथे वास्तव्य केले व तिथून ते थेट अक्कलकोट येथे आले. 
          काही यवनांनी पाहिले की महाराज तीन दिवस उपाशी असून मंदिरात बसून आहेत. तेव्हा त्यांच्यातील मोहम्मद रसुलदारास त्यांनी रिकाम्या चिलमीतून धुर काढून दाखविला व ईश्वरी अवताराची प्रचिती दिली. पुढे त्या यवनांनी महाराजांना चोळप्पांच्या घरी भोजनास नेले. तिथून चोळप्पा महाराजांचे एकनिष्ठ शिष्य बनले. श्री स्वामींची प्रचिती, महती अक्कलकोटच्या ग्रामवासीयांपर्यंत पोहोचली. तिथून पुढे अक्कलकोटचे राजेसाहेब भोसले हे सुद्धा महाराजांचे परमभक्त झाले. कधी कधी श्री स्वामी समर्थ राजवाड्यात चार चार दिवस मुक्काम करीत असत. श्री स्वामींनी राजांपासून रंकांपर्यंत अनेकांवर प्रेमाचा आणि आशिर्वादाचा वर्षाव केला. 
          आपण यजुर्वेदी ब्राह्मण, गोत्र काश्यप आणि रास मीन असल्याचे श्री स्वामींनी स्वतः सांगितले. आपल्या वास्तव्य काळात बालोन्मत्त पिशाच्च वृत्तीत राहून अनेक लीला करून दाखविल्या, चमत्कार केले. ते भ्रमण करीत असताना वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध झाले. अनेक जाती धर्माचे लोक त्यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन येत. व श्री स्वामी त्या समस्या दुर करीत असत. कधी कधी ते रुद्र अवतार धारण करीत व लोकांचे गर्व हरण करीत असत. आपल्या प्रत्येक शिष्याला ऐपतीप्रमाणे, क्षमतेनुसार पताका फडकवण्याची कामगिरी सोपवली. त्यांच्या शिष्यांनी पुढे अनेक ठिकाणी मठांची आणि श्री स्वामी मंदिरांची स्थापना केली. अनेक सेवा केंद्रे सुरू केली. अनेक भक्तांना त्यांनी त्या भक्तांच्या इष्ट देवतांच्या रूपातही दर्शन दिले. अन्नपूर्णा होऊन अनेक भक्तांचे पोट भरले. अनेक दरीद्रांना कुबेर बनून धनवान बनवले. अनेक वंध्यत्व असलेल्यांना संतानप्राप्ती घडवून दिली.    
          अशा या श्री स्वामी महाराजांच्या गुणांचे थोडक्यात वर्णन करने खुप कठीण काम आहे. या साठी आम्ही तुमच्यासाठी श्री स्वामी महाराजांच्या सविस्तर कथा घेऊन येणार आहोत. तेव्हा सर्व स्वामी भक्तांनी त्या कथांचे अमृतानुभव घ्यावे आणि भक्तांनी तृप्त होऊन जावे ही श्री स्वामीं चरणी प्रार्थना. आणि या कार्यात सफल होण्यासाठी श्री स्वामी भक्तांचा मोलाचा वाटा असणार आहे. तर निरोप घेवून पुन्हा नव्या लेखात भेटण्याची इच्छा मनात धरून तुमचा निरोप घेतो.

     ‌       श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ||

थोडे नवीन जरा जुने