श्री नृसिंह सरस्वती

श्री नृसिंह सरस्वती


          श्री स्वामी समर्थ, नमस्कार स्वामी भक्तहो. आज आपण श्री दत्त गुरुंच्या तिसऱ्या अवतारा बद्दल जाणून घेणार आहोत. श्री नृसिंह सरस्वती यांना श्री दत्त गुरुंचे तिसरे अवतार मानले जाते.
         श्री नृसिंह सरस्वतींचा कालखंड हा शके १३०० ते १३८० म्हणजेच इ.सन १३७८ ते १४५८ असा आहे. कारंजा नगरातील व आजसनेय शाखेच्या एका ब्राह्मणाच्या घरी अंबा नावाच्या सुकन्येचा जन्म झाला. त्याच गावातील एक शिवभक्त माधव यांचा त्या कन्येशी विवाह झाला. श्री दत्त गुरुंनी वचन दिल्याप्रमाणे पौष शुद्ध द्वितीयेला शनिवारी माध्यान्ह काळात अंबेच्या पोटी श्री दत्त गुरुंनी जन्म घेतला. हेच बालक पुढे श्री नृसिंह सरस्वती म्हणून प्रसिद्ध पावले. बालकाचा जन्म होताच ते बालक आपल्या मुखातून ॐकार स्वर काढू लागले. हे पाहून जमलेले सर्व जन आश्चर्यचकित झाले. 
          तेव्हा त्या दांपत्यानी तत्कालीन महान ज्योतिषाकडून त्या बालकाची पत्रिका बनवली. तेव्हा ज्योतिष म्हणाले, हे बालक साक्षात ईश्वराचा अवतार आहे. हे बालक पुढे श्री नरहरी प्रमाणे सर्व नरांचे पाप, ताप, दैन्य हरेल त्यामुळे याचे नाव नरहरी ठेवावे. असे त्या ज्योतिषानी सुचवले. 
         या बालकाने आपल्या वयाच्या सात वर्षांपर्यंत ॐकार शिवाय एकही शब्द उच्चारला नव्हता. त्यामुळे हे बालक मुके निपजते की काय अशी शंका त्यांच्या आईवडिलांना होऊ लागली. तेव्हा अंबेने त्या बालकास प्रेमाने जवळ घेऊन त्याला विचारले की, बाळा तू केव्हा बोलशील? तेव्हा त्या बालकाने खुनवून आईस सांगितले आम्ही व्रतबंधनाच्या वेळी बोलू. 
          ई.सन १३८५ ला शुभमुहूर्तावर नरहरीचे व्रतबंधन करण्यात आले. गायत्री मंत्राची दीक्षा घेतल्या नंतर तो कुमार आई कडे भिक्षा मागण्यासाठी आला. तेव्हा ऋग्वेदातील मंत्रांचा उच्चार त्या बालकाने केला आणि सर्वांना आश्चर्याच वाटले. आणि हे कुमार ईश्वरी अवतार असल्याची सर्वांना खात्री पटली. 
          वेदाभ्यास करण्यासाठी ते कुमार जगभर फिरावयाचा मानस धरुन घरदार सोडू इच्छित होते. त्यामुळे आईवडील चिंताग्रस्त झाले. पण मातेच्या आग्रहावरून ते मूंजी नंतर एक वर्ष कारंजा मध्ये राहिले. मातेला दोन पुत्र झाल्यानंतर ते काशी क्षेत्रास निघून गेले. जान्याआधी मातेला पुत्र हा ईश्वर अवतार असल्याचा साक्षात्कार झाला. त्यांनी मातेला आणखी चार पुत्र होतील असे आश्वासन दिले. आणि स्मरन करताच दर्शन देऊ असे वचन दिले. 
          पुढे ते बद्री केदारला गेले. काशीला असताना त्यांनी उग्र अनुष्ठाने केली. अनेक जनांनी त्याची कठोर साधना पाहून नतमस्तक झाले. परंतु संन्यासी लोकांना त्यांना नमस्कार करता येईना म्हणून वयोवृद्ध संन्यासी श्री कृष्ण सरस्वती स्वामींनी नरहरींना चतुर्थाश्रम स्विकारण्याची विनंती केली. 
          विनंतीस मान देऊन त्यांनी ई. सन १३८८ ला संन्यास दिक्षा स्विकारली. व नरहरींचे श्री नृसिंह सरस्वती असे नवीन नामकरण केले. पुढे काशीस निरोप देऊन प्रयागला तीन वर्षं वास्तव्य केले. आणि माधव सरस्वती, बाळकृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती, कृष्ण सरस्वती आणि सिद्धसरस्वती यांना विधियुक्त संन्यास दिक्षा देऊन आपले शिष्य बनवले. पुढे सातही शिष्यांसोबत उत्तरेला निरोप देऊन दक्षिणेकडे प्रयान केले. आणि करंजेला आपल्या मातापित्यांच्या भेटीस आले. आपल्या पुत्राला पाहून त्यांना खूप आनंद झाला. काही दिवसांनी पुन्हा निरोप घेऊन लोककल्याणासाठी निघाले. एक वर्ष वैजनाथ येथे गुप्त पणे वास्तव्य केले. गुप्त वास्तव्या नंतर इ. सन १४२१ ला भिलवडी येथील भुवनेश्वर येथे चार महिने वास्तव्य केले. कृष्णा- पंचगंगा संगमावर येताना त्यांनी आपल्या पादुका स्थापन केल्या. पुढे नृसिंह वाडीत ई. सन १४२२ ते १४३४ पर्यंत बारा वर्षे वास्तव्य केले. ते क्षेत्र आज नरसोबाची वाडी म्हणून प्रसिद्ध आहे. तेथून ते पुढे भीमा अमरजा संगमावर आले. तिथे त्यांनी ई. सन १४३५ ते १४५८ पर्यंत वास्तव्य केले. या तेवीस वर्षाच्या कालावधीत त्यांनी अनेकांचा उद्धार केला. औदुंबराच्या झाडाखाली आपल्या मनोहर पादुका आहेत. असे सांगून ते पुढे भीमा तिरी असलेल्या गाणगापूर या ठिकाणी येऊन स्थिरावले. 
          पुढे त्यांनी अनेकांना आपले अवतार कार्य संपवणार असल्याच्या पुर्व सुचना दिल्या. त्यांच्या आज्ञेप्रमाणे निर्वाणाची तयारी करण्यात आली. केळीच्या पानावर फुलांचे आसन तयार करण्यात आले. नामघोष करीत ते आसन नदीच्या पाण्यावर ठेवण्यात आले. त्या आसनावर आरूढ होऊन सर्व शिष्यांचा निरोप घेऊन ते प्रवाहाच्या दिशेने मार्गस्थ झाले. आणि बघता बघता ते आसनासहीत अदृष्य झाले. आणि त्यांच्या जागी पाण्यावर चार फुले तरंगताना दिसू लागली. अशा या कल्याणकारी श्री नृसिंह सरस्वतींनी अनेक भक्तांचे कल्याण करून, त्यांचा उद्धार करून या जगाचा निरोप घेतला. त्यांनी निरोप जरी घेतला असला तरी अनेक भक्तांना आजही ते प्रचिती देतात. अशा श्री नृसिंह सरस्वतींना वंदन करून या लेखनाची समाप्ती करीत आहे. हा लेख अनेक पुस्तके आणि माहितीपत्रके यांचा अभ्यास करूनच तयार करण्यात आला आहे. याची वाचकांनी नोंद घ्यावी. आपला निरोप घेतो

              श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ||


थोडे नवीन जरा जुने