श्री दत्त गुरु

श्री दत्त गुरु
          श्री दत्त गुरु ही देवता हिंदू धर्मात अनेक भाविक तसेच दत्त संप्रदाया मार्फत मोठ्या मनोभावाने पुजली जाते. श्री दत्त हे ऋषी अत्री व त्यांची पत्नी अनुसया यांचे पुत्र आहेत. व दुर्वास आणि सोम हे त्यांचे दोन भाऊ आहेत. पौराणिक कथांनुसार श्री दत्त, दुर्वास आणि सोम हे क्रमशः विष्णु, शिव आणि ब्रह्मा यांचे अवतार मानले जातात. मानले जाते की, दत्तात्रेय हे योगसिद्धी प्राप्त करून देणारी देवता आहे. 
          दत्तात्रयांचे स्वरूप जर पाहिले, तर ते कधी त्रिमुखी तर कधी एकमुखी अशी त्यांची चित्रे आढळली आहेत. औदुंबराच्या झाडाखाली अग्निकुंडासमोर बसलेले आहेत. गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा आहेत. अंगावर भस्माचे पट्टे आहेत. त्यांच्या मागे गाय तर समोर चार कुत्रे आहेत. सभोवताली हिरवागार परिसर आहे. श्री दत्त हे पितांबर नेसून ध्यानस्थ बसलेले असे हे त्यांचे स्वरूप त्यांच्या तस्बीरीतून पहायला मिळते. 
          श्री दत्त यांच्या जन्म अवताराची कथा खुपच गोड आहे. माता अनुसया या त्रिलोकात पतिव्रता नारी आणि आतिथ्यासाठी खुपच प्रसिद्ध होत्या. त्या पवित्र नारीची परिक्षा घेण्यासाठी ब्रह्मा, विष्णु आणि महेश हे ऋशींचे वेश धारण करून अनुसयेकडे येतात आणि ईच्छा भोजन म्हणून नग्न होऊन अन्नदान करावे अशी मागणी करतात. तेव्हा अनुसयांनी त्या तिघांना बालक बनवले आणि स्तनपान करवले. तेव्हा ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांनी प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितला. तेव्हा त्या तिघांनी‌ यापुढे अनुसयेचे पुत्र म्हणून जवळ रहावे असा वर अनुसयेने मागितला. आणि हीच बालके पुढे श्री दत्तात्रेय म्हणून प्रसिद्ध झाली. 
          सुमारे पाचव्या शतकापासून श्री दत्त हे वाङमयातून प्रसिद्ध आहेत. मार्कंडेय पुराणातील सतरा आणि अठराव्या अध्यायामध्ये त्यांचा उल्लेख आहे. त्यांचे साधक त्यांना गुरूदेव म्हणून संबोधतात. श्री दत्त यांचे काही शिष्य जसे यदु, आयु, अलर्क, सहस्त्रार्जुन, परशुराम हे क्षत्रीय होते. तर सांकृती हा शिष्य महामुनी होता. 
          श्री ज्ञानदेव आणि श्री एकनाथ हे देखील दत्तोपासक होते. यावरूनच श्री दत्त हे वारकर्यांमध्येही पुजनिय होते हे समजते.
          पुढे इ. सन. १३७८ साली श्रीपाद वल्लभ व नृसिंह सरस्वती यांनी जन्म घेऊन दत्त संप्रदायाचे पुनरूज्जीवन केले. 
या सर्व ऐतिहासिक घटना व त्यांचा कालखंड हा कदाचित तंतोतंत आढळणे अशक्य आहे. एवढी माहिती देऊन आणखी माहिती आम्ही आपणासाठी नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न करू. तो पर्यंत आपला निरोप घेतो. नमस्कार,

                श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ||



थोडे नवीन जरा जुने