श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय १९

श्री स्वामी चरीत्र सारामृत (मराठी अनुवाद) अध्याय  १९

         श्री स्वामी समर्थ, सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय एकोणीसावा या बद्दल जाणून घेणार आहोत.
          ग्रंथकार म्हणतात, आपण जर हा अध्याय एकाग्र चित्ताने श्रवण केल्यास‌, आपल्याला दिव्य ज्ञानाची प्राप्ती होईल. आणि त्या ज्ञानाने परमार्थ साधनांचा मार्ग सुलभ होईल. परिणामी चित्तास परमानंद प्राप्त होऊन आपल्याला या भवसागरातून तरून जाता येईल. नरदेहातून मुक्तता मिळुन मोक्षाची प्राप्ती होईल अशी खात्री या अध्याआच्या प्रारंभी ग्रंथ कर्त्याने श्रोत्यांना दिली आहे.
          असे सांगून ग्रंथकार अध्यायाच्या पुढील कथेस प्रारंभ करतात. प्रसिद्ध आळंदी क्षेत्रात ज्यांची ख्याती सर्वत्र अजरामर झाली असे श्री नृसिंह सरस्वती नावाचे सत्पुरुष होऊन गेले. त्यांनी कृष्णा नदीच्या तटावरील अनेक पवित्र क्षेत्रांना भेटी दिल्या. अनेक प्रकारच्या योगाभ्यासांचे ज्ञान असलेल्या महासाधुंना भेटले. आपल्याला हठयोग साधना करता यावी ही इच्छा मनात धरून, गुरुचा शोध करीत नाना स्थाने फिरले. अनेकांचे त्यांनी ज्ञान पाहिले, अनेकांचे चरण धरले परंतु सर्व कष्ट व्यर्थ ठरले. हठयोग साधना ही फारच कठीण असल्याने कोणीही नृसिंह सरस्वतींना योग्य मार्गदर्शन करु शकले नाही. 
          एक दिवस श्री स्वामींचा महिमा ऐकून त्यांना श्री स्वामींना भेटण्याची तीव्र इच्छा जागृत होते व ते अक्कलकोटला येऊन पोहोचतात. श्री स्वामींना नृसिंह सरस्वतींच्या येण्यामागचे कारण आधीच ठाऊक होते. श्री स्वामींचे दर्शन घडताच, श्री स्वामींनी आज्ञाचक्र भेदांताचा एक श्लोक म्हटला. श्लोक ऐकताच नृसिंह सरस्वतींची समाधी लागली. ब्रम्हरंध्रातून प्राणवायूचा संचार होऊन, देह अचेतन झाला. जमलेल्या सर्वांना खूप आश्चर्य वाटले.
            काही वेळाने नृसिंह सरस्वतींची समाधी उतरली. व भानावर येताच धावत जाऊन श्री स्वामी चरणांना कडकडून मिठी मारली. श्री स्वामी दर्शनाने परमानंद झाला. व म्हणाले हठयोग शिकण्यासाठी खूप प्रयत्न केले पण सर्व कष्ट व्यर्थ गेले. आज तुमच्या कृपेने माझी ईच्छा पूर्ण झाली. सर्व चिंता दूर होऊन कार्यभाग साधला गेला. 
           काही दिवसांनी श्री स्वामींची आज्ञा घेऊन नृसिंह सरस्वती आळंदीला परत आले. सिद्धी प्रसन्न असल्याने अनेक धर्मकृत्ये केली. दुरदुरवर नृसिंह सरस्वतींची किर्ती पसरली. एक दिवस पुन्हा श्री स्वामींच्या दर्शनासाठी ते अक्कलकोटला येतात. गुरुमुर्ती पाहून नृसिंह सरस्वती पुढे हात जोडून उभे राहतात. तेव्हा श्री स्वामी त्यांना म्हणतात, 'का रे अजून सिद्धी सोडली नाहीस का? सिद्धी सोडून दे तरच जगामध्ये श्रेष्ठत्व प्राप्त होईल. आणि अंती सुखाने सहज सुरभुवनी जाशील. 
          हे ऐकून जमलेल्या लोकांना आश्चर्य वाटले, श्री स्वामी नृसिंह सरस्वतींना असं विपरीत करण्यास का सांगत आहेत. पण नृसिंह सरस्वतींना आपल्या मुळ दुःखाचे कारण समजले आणि श्री स्वामींंच्या आज्ञेने सिद्धी सोडून दिली. व पुन्हा आळंदीला आले. 
          तसेच भक्तगणांमध्ये एक भक्त होते. त्यांचे नाव यशवंतराव भोसेकर असे होते. त्यांना लोक देव मामलेदार म्हणूनही ओळखत होते. त्यांनाही श्री स्वामी कृपेने संपूर्ण ज्ञानाची प्राप्ती झाली. 
          त्याकाळी वासुदेव बळवंत फडके नावाचे एक थोर ब्राह्मण होते. त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंग्रजी अंमलात बंड पुकारले होते. श्री स्वामींच्या कृपेचा महिमा ऐकून ते अक्कलकोटला येतात . व श्री स्वामींच्या हातून तलवार मिळाली तर आपल्याला श्री स्वामी कृपेने हमखास यश मिळेल.या समजुतीने वासुदेव फडके श्री स्वामींच्या समोर तलवार ठेवतात व दुर जाऊन उभे राहतात. 
          पण या कार्यामध्ये यश मिळणार नाही कारण ही योग्य वेळ नाही हे सुचवण्यासाठी श्री स्वामी ती तलवार जवळच्या तरवडाच्या झाडाच्या फांदीवर ठेवून देतात. श्री स्वामींना काय सुचित करायचे आहे हे वासुदेव फडक्यांना समजते पण पहिले मायभुमीचे कर्तव्य शिरसावंद्य मानून ते बंड पुकारतात. आणि पुढे काय घडले हा इतिहास सर्वांनाच माहित आहे. 
          तसेच एक राजाश्रित सरदार अक्कलकोटात रहात होते. त्यांचे नाव तात्यासाहेब भोसले असे होते. ते रात्रंदिवस श्री स्वामी चरणी लीन होऊन भजन पूजन करत असत. एक दिवस अचानक ते खुप भयभीत झाले कारण त्यांना यमाची साऊली दिसली.आपला मृत्यू समीप आला आहे असे त्यांना कळले. तेव्हा तात्यांनी श्री स्वामींना आपले मरण चुकविण्याबद्दल विनंती केली. तेव्हा श्री स्वामींनी यमास आज्ञा केली की, याला हातही लावू नकोस हां माझा भक्त आहे. या बैलाचे मरण जवळ आले आहे तू याला घेऊन जा. आणि काय आश्चर्य तात्काळ बैलाचे प्राण जाऊन ‌बैल जमीनीवर कोसळला. अशा प्रकारे बैलाला मुक्ती मिळवून दिला आणि तात्यांचे प्राण वाचवले. 
          पुढे ग्रंथकार म्हणतात, श्री स्वामींनी अशा अनेक लीला करून दाखविल्या आहेत. त्या सर्व लीलांचे इथे वर्णन केल्यास हा ग्रंथ समुद्रा प्रमाणे पसरेल. त्यामुळे लिखाणास हात आखडता घ्यावा लागला. असे सांगून श्री स्वामी चरीत्र सारामृताच्या या एकोणिसाव्या अध्यायाची समाप्ती ग्रंथकार करतात.
                 श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ 


          थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना,
 श्री स्वामी समर्थ||








थोडे नवीन जरा जुने