संत नामदेव

संत नामदेव


           श्री स्वामी समर्थ, महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. त्यामुळेच महाराष्ट्राला संतांची भुमी असे म्हटले जाते. या संतांनी समाजसुधारणेचे मोठे काम केले. समाजाला अनेक आध्यात्मिक ग्रंथ आणि ओव्या दिल्या, अभंग दिले. या संतांना जानून घेण्यासाठी या लेखांना सुरुवात करीत आहोत. आशा आहे की आपल्याला ही शृंखला नक्की आवडेल. 
          आज आपण अशाच एका संताबद्दल जाणून घेणार आहोत. त्या संताचे नाव संत नामदेव असे आहे. संत नामदेवांचा जन्म २६ ऑक्टोबर १२७० मध्ये झाला. व त्यांचे मुळ नाव नामदेव दामा रेळेकर असे होते. ते महाराष्ट्रातले वारकरी संतकवी होते. व्रज भाषेतील त्यांची काव्ये प्रसिद्ध आहेत. संत नामदेवांना सर्वात जुन्या काळातील संतकवीं पैकी एक मानले जाते. संत नामदेवांनी शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबाच्या कीर्तनातून भागवत धर्म पंजाब पर्यंत नेला. त्यांचे जन्मस्थळ असलेले नरसी नामदेव या महाराष्ट्रातील असलेल्या गावाचा विकास करण्यासाठी पंजाबी मंडळी आजही धडपड करत असतात. तेथील संत नामदेवांच्या मंदिराचा जिर्णोद्धार २०१९ साली करण्यात आला. 
          आपल्या सुमधुर कीर्तन कलेच्या जोरावर साक्षात विठूरायाला मान डोलवायला लावणारे संतकवी अशी त्यांची ख्याती होती. संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाची ध्वजा पुर्ण भारतभर फैलावली. 
          त्यांच्या वडिलांचे नाव दामाशेट्टी तर आईचे नाव गोणाई असे होते. दामाशेट्टींचा कपडे शिवण्याचा व्यवसाय (शिंपी) होता. संत नामदेवांचा जन्म प्रभव नाम संवत्सरात, शके ११९२ म्हणजेच इ.स. १२७० मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीला रोहिणी नक्षत्रावर झाला. रविवारचा तो दिवस होता. पुढे त्यांचे बालपण हे पंढरपूरातच गेले. लहानपणापासूनच संत नामदेवांना विठ्ठलाचा नाद लागला व ते विठ्ठलाचे अनन्यसाधारण भक्त बनले. 
           पुढे पंढरपूरात त्यांची भेट संत ज्ञानेश्वर व इतर तत्कालीन संतांशी झाली. संत ज्ञानेश्वरांच्या विनंतीने गोरोबाकाकांनी सर्व संतांच्या उपस्थितीत आध्यात्मिक तयारी विषयी आपले मत प्रदर्शित केले. या प्रसंगा नंतर संत नामदेवांनी विसोबा खेचर यांना आपले आध्यात्मिक गुरू मानले. 
          संत नामदेवांच्या कुटुंबात त्यांची पत्नी राजाई, मोठी बहीण आऊबाई या व्यक्ती होत्या. तर त्यांना नारा, विठा, गोंदा, महादा व मुलगी लिंबाई अशी पाच अपत्ये होती. स्वतःला नामयाची दासी म्हणवून घेणाऱ्या संत जनाबाई याही याच परिवारातील होत्या. तसा त्यांचा परिवार एकूण पंधरा माणसांचा होता. 
          संत नामदेवांचे सुमारे २५००अभंग प्रसिद्ध आहेत. तर काही १२५ पदांचे अभंग त्यांनी शौरसेनी भाषेत लिहिले. त्यातील बासष्ट अभंग गुरुमुखि लिपीतील असून ते शिखांच्या गुरु ग्रंथसाहिबामध्ये नामदेवकी मुखबानी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या काही गाथांमधून संत ज्ञानेश्वरांचे चरित्रही सांगण्यात आले आहे. त्या चरित्रांचा उल्लेख आदि, समाधी आणि तिर्थावळी या गाथांमध्ये आढळून येतो. 
          किर्तन करीत असताना संत नामदेव अनेक ग्रंथांचा उल्लेख करत असत यावरुन ते खुप अभ्यासु होते याची खात्री होते. संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर सुमारे ५० वर्षे संत नामदेवांनी भागवत धर्माचा प्रचार केला. त्यामुळे त्यांना भागवत धर्माचे आद्य प्रचारक म्हणून प्रसिद्धी मिळाली. पंजाबमधील शीख बांधव या संताला खुप मानतात. महाराष्ट्रातील लोकांच्या भावनिक एकात्मता जपण्याचे काम त्यांनी केले. राजस्थानात असलेल्या शीख बांधवांनीही संत नामदेवांची मंदिरे उभारली आहेत. त्यामुळे लोकांनी त्यांना संत शिरोमणी ही पदवी दिली. 
           पुढे संत नामदेवांनी आषाढ वद्य त्रयोदशीला, शके १२७२ मध्ये, शनिवारी दिनांक ३ जुलै १३५० रोजी पंढरपूर येथे वैकुंठ गमन केले. विठ्ठल मंदिराच्या महाद्वारात पायरीचा दगड होण्यात संत नामदेवांनी आपली धन्यता मानली. अशा या संत शिरोमणी संत नामदेव महाराजां बद्दल थोडक्यात लिहिणे खुपच कठीण काम आहे. काही त्रुटी असल्यास आपणच क्षमा करावी. आशा आहे की हा लेख आपणास आवडला असेल, तर पुन्हा भेटूया आणखी एका नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना

              श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ||






थोडे नवीन जरा जुने