संत एकनाथ

संत एकनाथ


           श्री स्वामी समर्थ, महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. त्यामुळेच महाराष्ट्राला संतांची भुमी असे म्हटले जाते. या संतांनी समाजसुधारणेचे मोठे काम केले. समाजाला अनेक आध्यात्मिक ग्रंथ आणि ओव्या दिल्या, अभंग दिले. या संतांना जानून घेण्यासाठी या लेखांना सुरुवात करीत आहोत. आशा आहे की आपल्याला ही शृंखला नक्की आवडेल. 
           आज आपण संत एकनाथां बद्दल जाणून घेणार आहोत. संत एकनाथांचा जन्म पैठण येथे इ. स. १५३३ मध्ये झाला. ते एक वारकरी संप्रदायातले संत होते. त्यांना सर्वसाधारणपणे लोक नाथ म्हणूनच ओळखत. संत एकनाथांचे पणजोबा संत भानुदास हे सुर्याची उपासना करीत. संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण तर आईचे नाव रुक्मिणी होते. आईवडील लहान असतानाच वैकुंठवासी झाल्यामुळे त्यांचे पालनपोषण हे आजोबांनी केले. त्यांच्या आजोबांचे नाव चक्रपाणी तर आजीचे नाव सरस्वती असे होते. 
             संत एकनाथांनी चाळीसगावचे रहिवासी सद्गुरू जनार्दन स्वामी देशपांडे यांना आपले मनोमन गुरू मानले. त्यावेळी जनार्दन स्वामी हे देवगिरीच्या दरबारी अधिपती होते. एकनाथांनी अनेक तीर्थयात्रा केल्या. दत्त महाराजांची मनोमन उपासना केली. संत एकनाथांना साक्षात श्री दत्त गुरूंनी दर्शन दिले अशी दंतकथा प्रचलित आहे. त्यामुळे एकनाथांना दत्तात्रयांचे द्वारी असलेले द्वारपाल अशी उपाधी देण्यात आली. 
          संत एकनाथांचा विवाह पैठण जवळ असलेल्या वैजापूर तालुक्यातील मुलीशी झाला. त्यांच्या पत्नीचे नाव गिरीजाबाई असे होते. त्यांना गंगा आणि गोदावरी या दोन मुली तर हरी नावाचा एक मुलगा होता. पुढे त्यांच्या मुलाने एकनाथांकडून गुरू दिक्षा घेतली आणि ते हरीपंडीत म्हणून प्रसिद्ध झाले. याच हरीपंडीतांनी एकनाथांच्या समाधी नंतर एकनाथांच्या पादुका दरवर्षी आषाढी वारीसाठी पंढरपूरास नेण्यास सुरुवात केली. कवी मुक्तेश्वर हे संत एकनाथांच्या मुलीकडूनचे नातू होते. 
            संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतर सुमारे अडीचशे वर्षांनंतर संत एकनाथांचा जन्म झाला. संत एकनाथांनी आपल्या साहित्यांद्वारे लोकांचे मनोरंजन तसेच प्रबोधनही केले. एकनाथांनी रचलेल्या अभंगरचना, भारुड, जोगवा,‌गवळणी आणि गोंधळ या साहित्यांनी समाजप्रबोधन करण्यात मोलाचा वाटा दिला. 'दार उघड बये दार' ही रचना तर आजही खुप प्रसिद्ध आहे. अभंगांमध्ये आणि इतर साहित्यांमध्ये संत एकनाथ 'एका जनार्दने' असा स्वतःचा उल्लेख करत. एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा. 
      ‌ संत एकनाथांनी एकादश स्कंदावर टिका करणारा 'एकनाथी भागवत' हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये मुळ १३६७ श्लोक आणि त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या. व्यास रचित मुळ भागवत १२स्कंदांचे आहे. संत एकनाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणा मध्ये सुमारे ४०,००० ओव्यांचा उल्लेख आहे. पुढे त्यांनी रुक्मिणी स्वयंवर हे काव्य लिहिले. दत्त गुरुंची आरतीही संत एकनाथ महाराजांनी लिहिली. पुढे संत एकनाथांनी ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. संत एकनाथ हे देवी भक्त, दत्त भक्त, महावैष्णव तर होतेच त्याबरोबर उत्तम देशभक्त ही होते. देशातील जातीभेद नष्ट करण्यासाठी संत एकनाथांनी आयुष्यभर खुप प्रयत्न केले.  
            आपल्या हयातीत संत एकनाथांनी अनेक शिष्य जोडले. त्यांचे शिष्य महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पसरलेले होते. त्यांपैकी काही शिष्यांची मठांची नावे खालीलप्रमाणे,

श्री नारायणगड (बीड)
श्री भगवानगड (नगर)
श्रीनाथ पीठ (अंजनगावसुर्जी)
श्री अमृतनाथ स्वामीं मठ (आळंदी)
श्री तुकाविप्र महाराज (पंढरपूर, अंजनावती)
श्री कृष्णदयार्णव महाराज
श्री गोपालनाथ महाराज ( यांचे मठ संपुर्ण भारतात आहेत)

           संत एकनाथांनी जनार्दन स्वामी, दत्तात्रेय, ऋषी अत्री, ब्रह्मदेव व नारायण यांना आपले आद्य व गुरू मानले. त्यांनी दत्त संप्रदायाची ध्वजा फडकावत ठेवली. कीर्तन आणि गायनाने मनोरंजन तसेच समाजप्रबोधन केले. संत एकनाथांचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या ११ गुरूं पैकी एक म्हणून केला जातो. 
       ‌‌ पुढे फाल्गुन वद्य षष्ठीला शके १५२१ म्हणजेच २६ फेब्रुवारी इ.स. १५९९ रोजी संत एकनाथांनी आपला देह ठेवला. फाल्गुन वद्य हा दिवस तेव्हा पासून एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जाऊ लागला. अशा संताचे वर्णन थोडक्यात करणे हे फारच कठीण काम आहे. आशा आहे की आपल्याला हा लेख नक्कीच आवडला असेल. आम्ही आपणासाठी आणखी काही संतांची माहिती घेऊन येऊ. तुमची साथ असने खुप गरजेचे आहे. तर पुन्हा भेटूया आणखी एका नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना

                  श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ||




थोडे नवीन जरा जुने