संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर


           श्री स्वामी समर्थ, महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. त्यामुळेच महाराष्ट्राला संतांची भुमी असे म्हटले जाते. या संतांनी समाजसुधारणेचे मोठे काम केले. समाजाला अनेक आध्यात्मिक ग्रंथ आणि ओव्या दिल्या, अभंग दिले. या संतांना जानून घेण्यासाठी या लेखांना सुरुवात करीत आहोत. आशा आहे की आपल्याला ही शृंखला नक्की आवडेल. 
           आज आपण अशाच एका संताबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचे नाव संत ज्ञानेश्वर महाराज असे आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म युव नाम संवत्सर, श्रावण वद्य अष्टमी, गुरूवार दि. २२ ऑगस्ट इ.स. १२७५ ला आपेगाव पैठण येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी असे होते. तर त्यांच्या आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते. त्यांना अनुक्रमे निवृत्तीनाथ हे थोरले तर सोपानदेव आणि मुक्ताबाई ही धाकटी भावंडे होती. 
            श्री ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी विवाहित असून त्यांनी संन्यास घेतला आणि ते काशीला गेले. विवाहित असल्याचे समजताच त्यांच्या गुरूंनी पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यासाठी विठ्ठलपंतांना परतावून दिले. 
          आळंदीला सहकुटुंब मुक्कामास आले तेव्हा संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना संन्यासाची मुले म्हणून लोक हिणवू लागले. गावाने त्या कुटुंबाला वाळीत टाकले. अनेक ब्राह्मणांनी त्या लहान भावंडांची मुंज करणे नाकारले. तेव्हा विठ्ठलपंतांनी याच्यावर उपाय काय म्हणून तत्कालीन धर्मशास्त्र्यांना विचारले. तेव्हा धर्मशास्त्र्यांनी एकच उपाय म्हणून देहदंडाची शिक्षा सांगितली. विठ्ठलपंतांनी व पत्नी रूक्मिणी बाईंनी मुलांना संस्कारापासून वंचित न ठेवण्यासाठी पहाटेच्या अंधारात गोदावरी नदीत आत्महत्या करून देहान्त प्रायश्चित्त घेतले. 
          पण हे प्रायश्चित्त घेतले तरीही संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना समाजाचा जाच काही चुकला नाही. समाज त्या भावंडांवर अन्याय करीतच राहीला. त्यानंतर संत ज्ञानेश्वर भावंडां सहीत पैठणला आले. तिथे भिक्षा मागून ती भावंडं आपला उदर निर्वाह करू लागली. इथेच संत ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली. अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केल्या. त्यांच्या लहान वयात असलेल्या शास्त्र ज्ञाना बद्दल ऐकून विद्वान ब्राह्मण दुःखी होत व त्या भावंडांचा तिरस्कार करीत. पुढे १२८८ साली धर्मशास्त्र्यांनी त्या चारही भावंडांची शुद्धी करून त्या चारही भावंडांना समाजात सम्मिलीत करून घेतले. 
          पुढे संत ज्ञानेश्वरांनी अहमदनगर मधील नेवासा येथे भगवदगीतेचा अनुवादवजा टीकाग्रंथ भावार्थदीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. त्यांनी लहान वयातच रेड्याच्या तोंडातून वेद वदवून घेतले व ब्राह्मणांचा गर्व हरण केला. एका योग्याचा गर्व नाश करण्यासाठी संत ज्ञानेश्वर आणि भावंडे भिंतीवर स्वार होऊन त्या योग्याच्या भेटीस गेले अशी दंतकथा प्रसिद्ध आहे. त्यांनी केलेल्या चमत्कारांचे लेख साहित्यही उपलब्ध आहेत. 
          पुढे अमृतानुभव हा ग्रंथ लिहिल्यानंतर ते पंढरपुरला आले. तिथे नामदेवांशी भेट घडून ते चांगले मित्र बनले. पुढे यांनी अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. व लोकांना वारकरी संप्रदायाची दीक्षा दिली. याच काळात ज्ञानेश्वरांच्या अभंग रचना फार प्रसिद्ध झाल्या. संत ज्ञानेश्वर पुढे अष्टांग योग मार्गात निपूण झाले. त्याकाळी खोल ध्यानस्थ अवस्था प्राप्त झाल्यावर स्वेच्छेने नश्वर शरीर सोडण्याची प्रथा होती. पुढे हिंदू कॅलेंडर नुसार कार्तिक महिन्यात कृष्ण पक्षाच्या १३व्या दिवशी, आपल्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली व जगाचा निरोप घेतला. संत ज्ञानेश्वरांची समाधी आळंदीला सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात आहे. त्यावेळी नामदेवांनी अपार शोक केले. ज्ञानदेवांना भेटण्यासाठी नामदेवांनी विठुरायाच्या चरणी प्रार्थना केली होती. संजीवन समाधी घेतल्यानंतर वारकरी संप्रदाय मानतात की संत ज्ञानेश्वर हे आजही जिवंत आहेत. 
          संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या भावार्थदीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी मध्ये ९००० ओव्या आहेत. हा ग्रंथ १२९० मध्ये लिहून पूर्ण झाला असे मानले जाते. त्यांचा दुसरा ग्रंथ अनुभवामृत किंवा अमृतानुभव हा ८०० ओव्यांचा आहे. या ग्रंथाला विशुद्ध तत्त्वज्ञानाचा आणि जीव व ब्रम्ह ऐक्याचा ग्रंथ आहे असे मानले जाते. पुढे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ लिहून चांगदेवांचे गर्वहरण केले. त्यानंतर हरिपाठ लिहिला. संत नामदेव,संत गोरा कुंभार, संत सावतामाळी यांना सोबत घेवून भागवत धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे काम संत ज्ञानेश्वरांनी केले. सर्वच भक्त प्रेमाने त्यांना माऊली म्हणत. अशा या माऊलीला वंदन करून या लेखाची समाप्ती करीत आहे. आशा आहे की आपल्याला हा लेख नक्कीच आवडला असेल.
तर पुन्हा भेटूया आणखी एका नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना 

        ‌ श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ||

 
थोडे नवीन जरा जुने