श्री गजानन महाराज शेगावचे

श्री गजानन महाराज शेगावचे 
          श्री स्वामी समर्थ, नमस्कार स्वामी भक्तहो. आज आपण श्री दत्त गुरुंच्या आणखी एका अवतारा बद्दल जाणून घेणार आहोत. श्री गजानन महाराज यांना श्री दत्त गुरुंचे अवतार मानले जाते.
          श्री गजानन महाराजांच्या जन्म तिथि बद्दल कुणालाच माहीती नसल्यामुळे त्यांचा जन्म कधी झाला हे कोणीच सांगू शकत नाही. परंतु माघ वद्य ७ शके १८०० म्हणजेच २३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी त्यांचे वय ३० च्या आसपास असताना, बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव येथे दिगंबर अवस्थेत श्री गजानन महाराज लोकांच्या दृष्टीस पडले. ते त्या वेळी देविदास पातुरकरांच्या मठाबाहेर बसून उष्ट्या पत्रावळीतील उरलेली भाताची शिते उचलून खात होते. हाच दिवस श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. 
           त्यांची उंची अंदाजे सहा फूट तर सडसडीत शरीरयष्टीचे होते. तुरळक दाढी व केस, दिगंबर व गुडघ्यापर्यंत पोहोचणारे हात. छापी गुंडाळलेली हातात चिलीम आणि अनवाने पाय अशी त्यांची देहचर्या. 
           श्री गजानन महाराज कुणाच्याही घरात लगबगीने घुसत किंवा एखाद्याच्या अंगणात मुक्काम करीत असत. कुणी भाकरतुकडा दिला तर खात नाहीतर तीनचार दिवस उपाशी रहात असत. कुणी पानी दिले तर पित नाही तर ओहोळालाच ओंजळ लाऊन आपली तहान भागवत. 
           श्री गजानन महाराजांना भाकरी सोबत शेंगा, हिरव्या मिरच्या किंवा पिठी साखर खुप आवडत असे. भक्तांनी प्रेमानं दिलेलं कोणतंही अन्न ते प्रसन्न भावाने ग्रहण करीत. आजही महाराजांच्या भंडार्यात पंचपक्वान्ना सोबत ज्वारीची भाकरी, अंबाड्याची भाजी आणि पिठले अवश्य करतात. श्री गजानन महाराजांना चहा सुद्धा खुप आवडत असे. गरमागरम चहा मिळाला की ते अतिशय आनंदित होत. 
           श्री गजानन महाराजांमधील साधुत्व जानून घेण्याचे काम सर्वात प्रथम बंकटलाल अग्रवाल यांनी केले. एकदा जानकिराम सोनाराने चिलीम पेटवण्यासाठी विस्तव दिला नाही म्हणून महाराजांनी बंकटलाल यांना चिलीमीवर काडी धरण्यास सांगितले. काडी चिलीमीला लागताच चिलीमीतून ज्वाळा निघू लागल्या. हा चमत्कार पाहून श्री गजानन महाराज हे ईश्वरी अवतार असल्याची बंकटलाल यांना प्रचिती आली. काशीच्या एका गोसाव्याने ती चिलीम महाराजांना शरण येऊन भेट म्हणून दिली होती. तसेच १२ वर्षे ओस पडलेल्या भास्कर पाटील यांच्या विहिरीला जलमय केले, ती विहीर आजही जलमय आहे. भास्कर पाटील नेहमी सावली सारखे महाराजां सोबत राहीले. महाराजांची सेवा करता यावी यासाठी बाळाभाऊंनी आपली पोस्टातील नोकरी सोडली. पुढे महाराजांनी बाळाभाऊंना आपल्या गादीवर बसवले. बाळाभाऊंनी २ वर्षे गादी सांभाळली. हरी पाटलांना कुस्तीचा फार शौक होता. एकदा गर्वाच्या भरात महाराजांना कुस्तीसाठी आमंत्रण दिले. महाराजांचा हात धरून त्यांना तालमीत आणले. तालमीत येताच महाराज मैदानावर खाली बसले. 'मला फक्त बसल्या जागेवरुन उठवून दाखव' असे महाराज पाटलास म्हणाले. पण पाटील महाराजांना जागचा हलवूही शकला नाही. पुढे पाटलाने शरणागती पत्करली व महाराजांची क्षमायाचना करु लागला. महाराजांनी प्रेमाने त्याचा गुन्हा माफ करून योग्य मार्गदर्शन केले. पूढे त्यांच्याच मळ्यामध्ये पेटलेल्या पलंगावर बसून ब्रम्हगिरी गोसाव्याचे गर्वहरण केले. बाळकृष्ण बिडवयी यांना १९०६ साली समर्थ रामदास स्वामींच्या रूपात दर्शन दिले. गंगाभारती यांना महारोगातून मुक्त केले. १९०८ मध्ये पुंडलिक यांना प्लेगाच्या रोगातून मुक्त केले. डॉ. भाऊ कवर यांचे फोड बरे केले. यांनीच आपल्या कॅमेऱ्यातून महाराजांचा प्रसिद्ध असलेला शाल पांघरलेला फोटो कॅप्चर केला. पुढे बापू काळेंना विठ्ठल रुपात दर्शन दिले. 
श्री गजानन महाराज नेहमी म्हणत कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे जिवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात. त्यांनी आपले संपूर्ण ३२ वर्षांचे आयुष्य शेगावात लोककल्याणासाठी घालवले असले तरी त्यांनी अकोला, मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली-अडगाव, पिंपळगाव, मुंडगाव, रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव अशा अनेक ठिकाणी भ्रमंती केली. महाराजांची चालगती गाठण्यासाठी लोकांना अक्षरशः धावावे लागे. महाराज नेहमी पंढरीच्या वारीला जात असत. अनेक तीर्थस्थाने त्यांनी पादाक्रांत केली. 
           जेव्हा महाराजांना कळले की आपले निर्वाण जवळ आले‌ आहे तेव्हा ते हरी पाटलांन सोबत पंढरीला गेले. परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने महाराजांनी शेगावातच समाधी घेण्याचे ठरवले. समाधी प्रसंगी लाखो भक्त हजर होते. सुवासिक द्रव्ये लावून अभ्यंगस्नान घालण्यात आले. सुवासिनींनी मंगलारती ओवाळली. भक्तांनी अबीर गुलाल उधळीत मोठ्या भक्तिभावाने मिरवणूक काढली. फुले, तुळशी आणि पैसे उधळित मिरवणूक शेगावातून मंदिरात आली. मंदिरात पुन्हा महाराजांवर अभिषेक करण्यात आला. शास्त्रानुसार त्यांचा देह उत्तराभिमुख ठेवण्यात आला. अखेरची आरती ओवाळली व जयजयकारात समाधीचे द्वार शिळा लावून बंद करण्यात आले. अशा या संतशिरोमणी असलेल्या श्री गजानन महाराजांनी ८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषीपंचमीच्या दिवशी शेगावात समाधी घेतली. 
          या शेगावीच्या राणाला वंदन करून मी माझे लिखाण पुर्ण करतो. पुन्हा भेटूया आणखी एका नव्या लेखाद्वारे तोपर्यंत

              श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ||
                         ||   गण गण गणात बोते   ||
थोडे नवीन जरा जुने