श्री साईबाबा शिर्डी

श्री साईबाबा शिर्डी 

          श्री स्वामी समर्थ, नमस्कार स्वामी भक्तहो. आज आपण श्री दत्त गुरुंच्या आणखी एका अवतारा बद्दल जाणून घेणार आहोत. श्री साईबाबा यांना श्री दत्त गुरुंचे अवतार मानले जाते.
          शिर्डीला आल्यावर भाविकांना मनःशांती आणि आत्मविश्वास प्राप्त होतो. त्यामुळे शिर्डी हे गाव लाखो भक्तांसाठी एक श्रद्धा स्थान आहे. शिर्डी हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील राहाता या तालुक्यात आहे. इथेच श्री साईनाथ १५ ओक्टोबर १८५६ मध्ये फकिराच्या वेशात प्रथम दिसले. पुढे त्यांनी याच गावात वास्तव्य केले. 
           श्री साईबाबा यांच्या जन्म तिथि बद्दल तसेच त्यांचे मातापिता, त्यांचा धर्म, जात आणि पंथ या बद्दल अधिकृत पणे कोणतीच माहिती मिळू शकत नाही. श्री साईबाबा हे निंबाखाली प्रकट झाले असे श्रद्धाळूंचे मानणे आहे. ते एका पडीक मशिदीत रहात होते. त्या मशिदीला श्री साईनाथ द्वारकामाई असे म्हणत. त्यांच्या अंगावर नेहमी पांढर्या रंगाची, मांजरपाटीची कफनी असे. डोक्याला पांढरा कपडा गुंडाळलेला असे आणि अनेक वर्षे एकच तरटाचा तुकडा आसन म्हणून वापरत होते. आपला डावा हात लाकडी कट्ट्यावर ठेवून, दक्षिणेकडे तोंड करून धुनीजवळ बसून रहात. त्यांनी अनेक भक्त जमवून अनेक भक्तांना शिर्डीस आकर्षित केले. कधी कधी द्वारकामाईस राजदरबाराचे स्वरूप प्राप्त होत असे. तरीही श्री साईनाथांनी आपली साधी जीवनशैली सोडली नाही. श्री साईबाबांसाठी सर्व जाती धर्माचे लोक हे एकसमान होते. हिंदुंना ते 'अल्लाह मालिक ' तर मुस्लिमांना 'भगवान भला करेगा' असे उपदेश करत. श्री साईबाबांनी नेहमी धर्मनिरपेक्षतेची सर्वांना शिकवण दिली. 
          श्री साईबाबांनी जरी समाधी घेतली असली तरी आजही ते भक्तांना आपल्या कृपेची अनुभुती देतात. साईबाबांच्या दरबारी आलेल्या प्रत्येक भक्तांची मनोकामना निश्चित पुर्ण होते. कोणताही भाविक साईबाबांच्या दरबारातून रित्या हाताने माघारी जात नाही अशी त्यांच्या भक्तांची दृढ श्रद्धा आहे. 
          तत्कालीन ब्रिटिश सरकारने सर्वप्रथम अहमदनगर कलेक्टरेट सर्व्हे मध्ये तसेच विकली रिपोर्ट ऑफ क्रिमिनल ईंटिलिजेंस ऑन पॉलिटिकल सिच्युएशन या दस्तऐवजांमध्ये श्री साईनाथ महाराजांची नोंद करुन ठेवली आहे. लोक त्यांना साधु, फकीर, अवलिया तसेच ईश्वरी अवतार मानत याचीही नोंद या दस्तऐवजांमध्ये पहायला मिळते. श्री साईबाबांचे काही भक्त हे उच्च शिक्षित होते. त्यांमध्ये क्रांतिकारक श्री गणेश श्रीकृष्ण खापर्डे, श्री हरी सिताराम दिक्षित, खानदेशातील भाटे मामलतदार, श्री चांदोरकर इत्यादींची नोंद आहे. श्री साईबाबांनी कोणत्याही उपासना पद्धतीचा अवलंब करण्या बाबत सांगितले नाही. श्री साईबाबांच्या समाधी नंतर कलेक्टर सी. ए. बेट्स यांनी २४/१०/१९१८ मध्ये श्री साईनाथांचा मोहम्मद ऑफ अननोन ओरिजीन असा उल्लेख केला आहे. आणि त्यांचे मुळ अज्ञात असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याकाळी असलेल्या ब्रिटिश गुप्तहेर आणि अधिकार्यांना सुद्धा त्यांचे मुळ शोधता आले नाही. 
          श्री साईबाबांनी नेहमी भिक्षा मागूनच उदर निर्वाह केला. आणि सर्वांना 'सबका मालिक एक' हा संदेश दिला. आपल्या भक्ती मध्ये श्रद्धा आणि सबुरी यांचे महत्वाचे स्थान आहे हे पटवून दिले. 
          श्री साईबाबांचे भक्त फक्त भारतातच नव्हे तर जगात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत. लोक त्यांना दत्ताचा अवतार मानीत त्यामुळे कित्येक ठिकाणी त्यांची मंदिरे उभारली आहेत. मुस्लिम धर्मीयांमध्ये श्री साईनाथांना सुफी संतां पैकी एक म्हणून मानाचे स्थान आहे. अनेक जाती धर्माचे लोक त्यांना मनोभावे पुजतात. अशा या संतश्रेष्ठ अवलियाने १५ ऑक्टोबर १९१८ ला महाराष्ट्रातील शिर्डी या गावी निर्वाण प्राप्त करून घेतले. आजही लाखो भक्त त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी शिर्डी मध्ये येतात. आपले दुःख व मनोकामना साईबाबांना सांगतात. व‌ या माऊली त्या मनोकामना मुक्तहस्ताने पुर्ण करतात. श्री साईबाबां बद्दल थोडक्यात वर्णन करणे खूप कठीण काम आहे. दिलेली ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा बाळगतो. पुन्हा भेटूया आणखी एका नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना

                     श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ||



थोडे नवीन जरा जुने