श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय १५

श्री स्वामी चरीत्र सारामृत (मराठी अनुवाद) अध्याय  १५
          श्री स्वामी समर्थ, सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय पंधरावा या बद्दल जाणून घेणार आहोत.
          तीर्थयात्रा करणे, हठयोग आदी साधनांचा आग्रह धरणे, वेदाभ्यास आणि शास्त्रज्ञान हे जरी योग्य रीतीने अवगत असले तरीही, केवळ निस्सीम आणि निरपेक्ष भावनेने जरी श्री स्वामींची मनोभावे भक्ती केली तरी चारी पुरूषार्थाची प्राप्ती होते. पाप, ताप, दैन्य यांपासून आपण मुक्त होतो. प्रपंचाचा सागर पार करून मोक्षाच्या पैलतीर गाठता येतो. आपल्या हातून योग्य कर्म आणि योग्य आचरण घडल्यास श्री स्वामी आपल्याला मोक्ष प्रदान करून, स्वर्ग मुखाचे द्वार खोलून देतात. 
          आपण जर नित्यनेमाने नामस्मरण करत असाल‌ तर, आपली जन्म मृत्यूच्या फेर्यातुन मुक्तता होते. हे नेहमी आपल्या स्मरणात असावे. असे मार्गदर्शन करुन ग्रंथकार पुढील अध्यायास प्रारंभ करतात. 
           श्री स्वामी कधीच फार काळ एका ठिकाणी थांबत नसत. आसपासच्या सर्व गावांना ते भेट देऊन आपल्या भक्तांची गार्हाणी ऐकत. आणि आपल्या भक्तांना योग्य मार्गदर्शन करून तसेच जरूरी असल्यास चमत्कार करूनही दुःख मुक्त करीत असत. 
          असेच एकदा श्री स्वामी मंगळवेढा येथे आले आणि श्री स्वामी काट्या कुट्यांची शय्या करून जमीनीवर निजले होते. त्याच गावात बसप्पा तेली नावाचा एक दरिद्री इसम रहात होता. आणि घरात चुल पेटवण्यासाठी सरपन शोधत शोधत बसप्पा, जिथे श्री स्वामी निजले होते तिथे येऊन पोहोचतो. 
          श्री स्वामींजवळ पोहोचताना बसप्पाच्या पायात काटा रूततो. पायातून काटा काढत असतानाच बसप्पाची नजर कंटक शय्येवर निजलेल्या श्री स्वामींवर पडते. आणि बसप्पाच्या मनात विचार येतो की, 'आपल्याला हा एवढासा काटा रूतला तर आपण इतके हळहळलो आणि हे दिगंबर अवस्थेत काट्यांवर झोपलेत. नक्किच हे कोणी सत्पुरुष असावेत.' तेवढ्यात श्री स्वामी बसप्पावर ओरडून म्हणतात 'आम्ही सत्पुरुष असो नाहीतर आणखी कोणी तुला काय करायचं आहे?'
          हे ऐकून बसप्पा चकित होतो आणि पुन्हा मनात म्हणतो, 'बापरे, हे तर मनकवडे सुद्धा आहेत.' तेव्हा श्री स्वामी कडाडून बसप्पावर ओरडतात, 'आम्ही मनकवडे असु नाही तर आणखी कोणी तुला कसली आली आहे पंचाईत. चल चालता हो.' हे ऐकून बसप्पाला श्री स्वामी कोणी साधारण व्यक्ती नसुन परमेश्वराचेच मानवी रूप आहे याची खात्री पटते.
          पुढे बसप्पा श्री स्वामींचा निस्सीम भक्त होतो. इतका श्री स्वामींच्या सेवेत रूजू होतो की कधी कधी त्याला आपल्या बायका, मुलांचीही आठवण होत नसे. श्री स्वामींच्या बालोन्मत्त पिशाच्च वृत्तीमुळे गावातील अजान गावकऱ्यांना श्री स्वामी वेडे वाटत. त्यामुळे बसप्पा ह्या वेड्या महाराजांच्या नादी लागून आपल्या संसाराची माती करत आहे असे म्हणून गावकरी आणि त्याची पत्नी बसप्पाला सारखे हिनवत असत. तरी बसप्पाने श्री स्वामी सेवा करणे सोडले नाही. 
           असेच एक दिवस श्री स्वामी सेवा करीत कधी संध्याकाळ झाली हे बसप्पाला कळलेच नाही. तेव्हा श्री स्वामींनी बसप्पाला 'घरी जा तुझी बायको माझ्या नावाने ठणाणा करीत आहे. तुझी मुले उपाशी आहेत' असे सांगितले. पण बसप्पाला श्री स्वामी चरण सोडवत नव्हते. बसप्पा श्री स्वामींचे पाय चेपीतच राहीला.
           तेव्हा श्री स्वामी उठतात आणि जलद गतीने, अरण्याच्या दिशेने चालू लागतात. श्री स्वामींची चालण्याची गती एवढी होती की बसप्पाला धावत धावत श्री स्वामींच्या पाठोपाठ जावे लागले. बसप्पा घरी जाण्याऐवजी पाठोपाठ सेवा करण्यासाठी येत आहे हे पाहून पुन्हा बसप्पाला श्री स्वामींनी घरी जाण्यास सांगितले. पण बसप्पाने नाही ऐकले. 
          बसप्पाला कळलेच नाही की कधी आपण श्री स्वामींच्या पाठोपाठ अरण्याच्या मध्यावर येवून पोहोचलो. काळाकुट्ट अंधार होता. आणि त्या अंधारात बसप्पाचा पाय एका सर्पाला लागतो आणि बसप्पा भाणावर येतो. आणि पाहतो तर काय आजुबाजूला अनेक सर्प रेंगाळत होते. 
          तेव्हा श्री स्वामी प्रेमाने बसप्पाला म्हणतात, ' घे, हवे तितके आजपासून तुझं दारिद्र्य संपलं. संकोच करू नकोस.' 
तेव्हा बसप्पा भित भित एका सापाला उचलून आपल्या डोक्यावरच्या कपड्यात गुंडाळतो. आणि श्री स्वामीं सोबत एका देऊळी येऊन पोहोचतो. 
          देवळाच्या ओसरीवर बसून बसप्पा ते कापड उघडून पाहतो तर, साप गुप्त होऊन त्या जागी सोन्याचा साप असतो. अशाप्रकारे श्री स्वामी, बसप्पाच्या इतक्या दिवसांच्या निस्सीम भक्तीचे फळ त्याला देतात. व त्याचे दारिद्र्य दूर करतात. पुढे श्री स्वामी बसप्पाला, प्रपंच करून परमार्थ साध असे सांगून, बसप्पाचा निरोप घेतात. 
          अशाप्रकारे श्री स्वामींनी बसप्पाचा भाग्योदय घडवून आणला. या अद्भुत कथेचा शेवट करताना ग्रंथकार पुढील अध्यायात आपण श्री स्वामीसुतांच्या कथेचे कथन करणार आहोत याची पुर्व सुचना करतात. आणि इथेच श्री स्वामी चरीत्र सारामृताच्या पंधराव्या अध्यायाची समाप्ती होते.
                श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ 

          थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना 
 श्री स्वामी समर्थ||








थोडे नवीन जरा जुने