संत जनाबाई

संत जनाबाई

           श्री स्वामी समर्थ, महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. त्यामुळेच महाराष्ट्राला संतांची भुमी असे म्हटले जाते. या संतांनी समाजसुधारणेचे मोठे काम केले. समाजाला अनेक आध्यात्मिक ग्रंथ आणि ओव्या दिल्या, अभंग दिले. या संतांना जानून घेण्यासाठी या लेखांना सुरुवात करीत आहोत. आशा आहे की आपल्याला ही शृंखला नक्की आवडेल. 
        ‌‌ आज आपण संत जनाबाईं बद्दल जाणून घेणार आहोत. संत जनाबाईंचा जन्म अंदाजे इ. स. १२५८ मध्ये परभणी येथील गंगाखेड या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दमा असे होते. ते फार मोठे विठ्ठल भक्त होते. जनाबाईंनी एका अभंगात म्हटले आहे, 'माझ्या वडिलांचे दैवत | तो हा पंढरीनाथ ||' यावरून त्यांचे वडीलही वारकरी संप्रदायातील असावेत अशी दाट शक्यता वाटते. महाराष्ट्रातील, खेड्यापाड्यातील अनेक स्त्रिया जात्यावर काम करताना जनाबाईंच्याच ओव्या गातात. 
          जनाबाईंचे वय पाच ते सहा वर्षे असावे अशा लहान वयात त्यांच्या वडिलांनी जनाबाईंना संत नामदेवांचे वडील दामा शेट शिंपी यांच्या कडे पाठवले. पुढे संत नामदेवांच्या कुटुंबात जनाबाईंनी स्वतःला सामावून घेतले. संत नामदेवांचा एकूण पंधरा माणसांचा परिवार होता. संत जनाबाई स्वतःला नामयाची दासी म्हणवून घेत. 
          संत नामदेव महाराजांच्या सानिध्यात असताना संत जनाबाईंनी स्वतःला विठ्ठल भक्तीत झोकून दिले. पुढे संत नामदेवांना आपले पारमार्थिक गुरू मानले. संत ज्ञानेश्वरांचा प्रभाव असलेल्या सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले होते. संत ज्ञानेश्वर - विसोबा खेचर - संत नामदेव - संत जनाबाई अशी गुरू परंपरा आहे. 
          संत जनाबाईंनी कृष्णजन्म, थाळीपाक, प्रल्हाद चरित्र, बालक्रीडा या विषयांवर अभंग लिहिले. त्यांची सुमारे ३५० अभंग रचना सकल संत गाथा या ग्रंथामध्ये सापडतात. संत जनाबाईंची आणखी काही अभंग रचना या नामदेव गाथेमध्येही सापडतात. त्यांनी हरिश्चंद्राख्यान नावाचे आख्यान लिहिले. थाळीपाक आणि द्रौपदी स्वयंवर या विषयांवर रचना करताना संत जनाबाईंना संत एकनाथांचे नातू महाकवी मुक्तेश्वर यांच्याकडून स्फुर्ती मिळाली. संत जनाबाईंच्या भावकवितेत भगवंतावरील प्रेम, निष्काम भक्ती आणि सर्व सुखांचा त्याग करून विठ्ठलाला शरण जाण्या विषयी ओतप्रेत पणे वर्णन केलेले आहे. त्यांच्या जीवनातील त्यांच्या अनंत अनुभुती त्यांच्या अभंगातून अनुभवायला मिळतात. संत जनाबाईंचे अभंग विठ्ठल भक्तीने परिपुर्ण आहेत वेळप्रसंगी देवाशी भांडायलाही त्या कमी पडत नसत. एखाद्या स्त्रीच्या अंगी जसे वात्सल्य, कोमल ऋजुता, सहनशीलता, त्याग, समर्पण हे गुण असतात तसेच भाव त्यांच्या अभंगांमध्ये दिसून येतात. 
           संत जनाबाईंनी भक्तीपर एकूण १५५ अभंग लिहिले.‌ यांमध्ये नाममहात्म्य, विठ्ठल महिमा, भक्ती स्वरुप, आर्त भक्तीपर अभंग यांचा समावेश आहे. त्यांनी परमार्थ जीवनावर एकूण ५६ अभंग लिहिले यांमध्ये मनाचा निश्चय, आत्मस्वरूप स्थिती, मागणे या अभंगांचा समावेश आहे. संत महिमेवर ४८ अभंग लिहिले यांमध्ये संतस्तुती, ज्ञानेश्वर स्तुती, सेना न्हावी आणि संत नामदेव या अभंगांचा समावेश आहे. संत जनाबाईंनी आख्यानपर एकूण ४५ अभंग लिहिले यांमध्ये हरिश्चंद्राख्यान, थाळीपाक, दशावतार, बालक्रीडा या आख्यानांचा समावेश आहे. त्यांनी एकूण ११ स्फुट काव्य रचना लिहिल्या यांमध्ये पाळणा, पदे, कूटरचना, आरती, जाते इत्यादींचा समावेश आहे. त्यांनी हीतवचनावर एकूण ३२ अभंग लिहिले त्यांमध्ये उपदेशवाणी आणि प्रारब्धगती यांचा समावेश आहे. संतांच्या सद्गुणांच्या रचना त्यांनी करून नवीन पिढीला संत परंपरेची जाणीव करून दिली आहे. वैष्णव कोणाला म्हणावे हे फार चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले आहे. संत जनाबाई म्हणतात नामदेव आणि ज्ञानदेव यांच्या सहवासात आपल्याला सोहम् साधनेचा मार्ग सापडला. 
          पुढे संत जनाबाईंनी श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढ कृष्ण त्रयोदशीला शके १२७२ मध्ये विठुरायाच्या चरणी देह ठेवला. व वैकुंठ गमन केले. अशा या संत जनाबाईं बद्दल थोडक्यात वर्णन करणे फारच अवघड काम आहे. आशा आहे की आपल्याला हा लेख नक्कीच आवडला असेल तर पुन्हा भेटूया आणखी एका नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना

           || श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ||

थोडे नवीन जरा जुने