श्री स्वामी समर्थ प्रकट झाले.

श्री स्वामी समर्थ प्रकट झाले. 
          श्री स्वामी समर्थ, स्वामी भक्तहो आज आपण श्री स्वामी समर्थांच्या प्रकट होण्यामागील कथे बद्दल जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थांचा जन्म कधी झाला याबद्दलची नेमकी नोंद कुठेच मिळत नाही. 
          असे मानले जाते की, श्री स्वामी समर्थ हे पुर्ण दत्त अवतारी आहेत. आणि श्री नृसिंह सरस्वती यांचाच पुनर्जन्म आहेत. श्री नृसिंह सरस्वतींनी अनेक भक्तांच्या मनोकामना पूर्ण केल्या. आणि इ.स. १४५९ मध्ये भक्तांना निरोप देऊन ते कर्दळी वनात गुप्त झाले. असे मानले जाते की, श्री नृसिंह सरस्वतींनीच पुढे कर्दळी वनात श्रीशैलम येथे, तीनशेहून अधिक वर्षं तपश्चर्या केली. इतक्या वर्षांच्या कालावधीत त्यांच्या आजुबाजूला झाडे, वेली आणि भलेमोठे मुंग्यांचे वारुळ तयार झाले. असेच एक उद्धव नावाचा लाकुडतोड्या जंगलातून लाकुड फाटा मिळावा यासाठी त्या वारूळा जवळ असलेल्या झाडावर कुर्हाडीचा घाव घालू लागला. असे करीत असताना त्या कुर्हाडीचा घाव चुकून वारुळावर बसला व वारुळाच्या आत तपश्चर्येला बसलेल्या यतीराजांच्या मांडीला दुखापत झाली. आणि यतीराजांच्या मांडीतून रक्त वाहू लागले. दुखापत झाल्यामुळे यतीराजांना तपश्चर्येतून जागृती आली. आणि ते यतीराज वारूळातून बाहेर आले. 
          सात फुट उंच, गुढग्या पर्यंत पोहोचतील येवढे हात, तेजस्वी शरीर रचना असलेल्या आणि त्यांच्या मांडीला आपल्यामुळे दुखापत झालेल्या सत्पुरुषास वारुळा बाहेर येताना पाहून उद्धवला भितीने दरदरून घाम फुटला. उद्धवने त्या सत्पुरुषाची खूप क्षमायाचना केली. त्या यतीराजांनी उद्धवास क्षमा करुन अभय दिले. व उद्धवास म्हणाले, तुझ्या हातून आज फार मोठे सत्कार्य घडले आहे. तुझ्यामुळे आमची इतक्या वर्षांची तपश्चर्या भंग पावली आणि या निमित्ताने लोकांनमध्ये जावून आम्हाला भक्तांवर कृपा करता येणार आहे. अधर्मीयांना धर्माच्या मार्गावर आणता येईल. आणि घाबरू नकोस तु कुर्हाडीचा प्रहार करावा ही आमचीच रचना होती तू फक्त निमित्त मात्र आहेस. आणि जेव्हा कधी लोक आमची कथा ऐकतील तेव्हा तुझ्या नावाच्या उच्चारा शिवाय आमच्या कथेला प्रारंभच होणार नाही. आता घरी जा यापुढे तुझे दारिद्र्य संपले, तुझे कल्याण होईल.' पूढे उद्धवाने त्याचे चरण स्पर्श करुन आपल्या मार्गी निघुन गेला. 
          पुढे त्या यतीराजांनी कर्दळी वनातून निघून पुर्ण भारतभर पदभ्रमण केले आणि अक्कलकोट येथे आले व तेथेच वास्तव्य केले. व श्री स्वामी समर्थ म्हणून प्रसिद्ध झाले. 
          श्री स्वामी समर्थांचे सर्वश्रेष्ठ भक्त व त्यांचे मानलेले सुत अर्थात श्री स्वामीसुत यांच्या मते श्री स्वामी समर्थ हे सर्व प्रथम पंजाब मधील छेली खेड्यात अवतरले. विजय सिंह नावाचा लहान मुलगा कोणीही मित्र मंडळी नसल्यामुळे नेहमी उदास असायचा. कोणीही त्याच्याबरोबर खेळत नसे. त्याच्या घराच्या अंगणात एक झाड होते त्या झाडाच्या खाली एक छोटे खाणी गणपतीचे मंदिर होते. विजयसिंह रोज गणपतीला खेळण्यासाठी येण्यास विनवणी करीत असे. पण गणपती काही खेळण्यासाठी येत नव्हते. एक दिवस विजयसिंह हट्टाला पेटतात व विनंती करतात 'हे गणराया आज जर तु माझ्या सोबत खेळायला नाही आलास तर अन्न पाणी त्यागेन.' खुप वेळा नंतर त्या मंदिरातून एक बालक प्रकट झाले. व ते विजयसिंहाचा हात पकडून गोट्या खेळण्यासाठी आमंत्रण देऊ लागले. विजयसिंह त्यादिवशी त्या बालका सोबत गोट्या खेळले. विजयसिंहाला त्या बालका सोबत खेळणे खूप आवडले, पुढे रोज ते बालक विजयसिंह सोबत गोट्या खेळू लागले. हेच बालक म्हणजे श्री स्वामी समर्थच होते. हे खुद्द श्री स्वामी समर्थांनीच स्वामीसुतांना सांगितले आहे, असे श्री स्वामीसुतांनी आपल्या अभंगातून सांगितले आहे. 
          श्री स्वामी समर्थांच्या प्रकट होण्याबद्दलच्या या दोन कथा आहेत. श्री स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोट येथे आले तेव्हा सर्व प्रथम ते खंडोबा मंदिरात थांबले. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया, शके १७७८, अनल नाम संवत्सरे, रविवार दि. ६/०४/१८५६ होता. तर छेली खेडे ग्रामात ते प्रकट झाले म्हणून स्वामीसुतांनी फाल्गुन कृष्ण त्रयोदशीला १७९३ पासून स्वामी जयंतीला सुरूवात केली. त्यामुळे श्री स्वामी समर्थ प्रकट दिना बद्दलही दुमत आहे. 
आशा आहे की आपल्याला श्री स्वामी समर्थांच्या या दोन कथा नक्की आवडल्या असतील, आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा, तर पुन्हा भेटूया आणखी एका नविन कथे सोबत तो पर्यंत मी आपला निरोप घेतो,

           || श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ||
थोडे नवीन जरा जुने