श्री शंकर महाराज

श्री शंकर महाराज 


          श्री स्वामी समर्थ, नमस्कार स्वामी भक्तहो. आज आपण श्री दत्त गुरुंच्या आणखी एका अवतारा बद्दल जाणून घेणार आहोत. श्री शंकर महाराज यांना श्री दत्त गुरुंचे अवतार मानले जाते.
           श्री शंकर महाराज यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील, बागलाण तालुक्यातील अंतापुर या गावी एका उपासनी कुटुंबात झाला. नेमकी जन्म तिथि बद्दल कोणतीही नोंद नाही, अंदाजे १८०० मध्ये त्यांचा जन्म झाला असावा. त्यांच्या बालपणाची, आईवडिलांची माहिती, शिक्षण, गुरु, साधना व शिष्य संप्रदायाबद्दल हवा तसा तपशील मिळत नाही. 
           श्री शंकर महाराज नेहमी म्हणत 'हम कैलास के रहने वाले, हमारा नाम शंकर.' ते‌ स्वतः वैराग्य-संपन्न शिवाचे अंश असल्याची प्रचिती अनेक भक्तांना करवून द्यायचे.
           नाशिक जिल्ह्यातील अंतापुर नावाच्या गावात चिमणाजी नावाचे गृहस्थ रहात होते. ते शिवाचे निस्सीम भक्त होते. पण त्यांना एकही संतान नसल्याने ते सदा उदास रहात. एक दिवस चिमणाजींना स्वप्न दृष्टांत झाला. स्वप्नातील दिव्य आवाजाने त्यांना निर्देश केला. 'रानात जा, तिथे तुला दोन वर्षांचे बाळ मिळेल. त्याला‌ शिवाचा प्रसाद समजून घरी आण आणि त्याला मातापित्याचे प्रेम दे, त्याचा पुत्र म्हणून सांभाळ कर.' पुढे स्वप्न दृष्टांताप्रमाणे चिमणाजींना रानात एक बाळ दिसले. ते दिव्य प्रकाशाने चमकत होते. आणि त्या बाळाचा सांभाळ दोन वाघ करीत होते. चिमणाजीला बाळाजवळ येताना पाहताच ते दोन वाघ तिथून शांतपणे निघून गेले. चिमणाजींनी शिवाचा प्रसाद समजून त्या बाळाला घरी आणले. बाळाला पाहून चिमणाजींच्या पत्नीला खुपच आनंद झाला कारण खुप विलंबा नंतर त्यांना पुत्र सुखाची प्राप्ती झाली होती. 
           काही वर्षं मातापित्यां जवळ राहून पुढे शंकर महाराजांना गुरुचा ध्यास लागला. गुरुंच्या शोधात बाहेर पडण्याची इच्छा त्यांनी आपल्या मातापित्यांना सांगितली व एक दिवस त्यांनी आपल्या मातापित्यांचा निरोप घेतला. घरा बाहेर पडते वेळी शंकर महाराजांनीच आपल्या मातापित्यांना आशिर्वाद दिला की, 'तुम्हाला पुत्र प्राप्ती होईल.' 
           ते संचार करीत अनेक गावे हिंडले. अनेक भक्तांनी त्यांना त्या वेळी सुपड्या, कुंवर स्वामी, गौरीशंकर अशी अनेक उपनामे दिली. काही ठिकाणी त्यांना अष्टवक्र म्हणूनही ओळखत होते. शंकर महाराज नेहमी गुडघे वर करून बसत असत. त्यांचे डोळे मोठे होते. आणि गुडघ्यां पर्यंत पोहोचतील येवढे लांब हात. त्यामुळे लोक त्यांना अजानुबाहू देखील म्हणत. 
              गुरु ध्यास घेऊन घराबाहेर पडल्यानंतर महाराजांचे नेमके नाव, रुप आणि स्थान सांंगणे कठिण जायचे. कारण ते कधी एका स्थानावर जास्त वेळ थांबत नसत. संचार करीत असताना शंकर महाराजांची त्रिवेणी संगम, सोलापूर, अक्कलकोट, त्र्यंबकेश्वर, नाशिक, नगर, पुणे, हैद्राबाद, तुळजापूर, औदुंबर, श्री शैल अशा अनेक ठिकाणी भटकंती असे.
त्यामुळे लोक त्यांना वैरागी शंकर म्हणूनही ओळखत. शंकर महाराज नेहमी आपल्या भक्तांना म्हणत 'सिद्धीच्या मागे लागू नका. काहींना सिद्धी ही प्रसिद्धीसाठी हवी असते. त्यामुळे नावलौकिक वाढतो. धनदौलत आणि शिष्य परिवार वाढतो आणि त्यामुळे लोक अहंकाराच्या आहारी जातात.' 
           शंकर महाराज हे अलौकिक पुरुष होते. सिद्धी संपन्न असुनही नावलौकिक व शिष्य परिवारादी उपाध्या मागे लावून घेतल्या नाहीत. आचार्य अत्रे, न्यायरत्न विनोद यांच्यासारखे विद्वान ही शंकर महाराजांना मानीत होते. व महाराजांची योग्यता जाणून होते. शंकर महाराज अनेक जाती धर्माच्या लोकांना उपदेश करीत असत. मुस्लिम धर्मीय देखील आपल्या समस्या घेऊन येत. तेव्हा महाराज त्यांना 'रोज नमाज पढत जा म्हणजे तुझ्या सर्व चिंता दूर होतील' असा सल्ला देत. त्यांना अनेक भाषेचे ज्ञान होते. शंकर महाराज नेहमी आपल्या भक्तांना त्यांच्या मातृभाषेत मार्गदर्शन करीत. कधी कधी अस्खलित इंग्रजी बोलून इंग्रजांना देखिल आश्चर्यचकित करुन सोडत असत. त्या वेळी ताईसाहेब मेहेंदळे प्रवचनकार फार प्रसिद्ध होत्या. शंकर महाराजांनी या ताईसाहेब मेहेंदळे यांच्या गळ्यावर बोटांनी स्पर्श केला आणि ज्ञानेश्वरी म्हणण्यास सांगितले. आणि ताईसाहेबांनी कंठस्थ असल्याप्रमाणे ज्ञानेश्वरी म्हटली. तेव्हा पासून ताईसाहेब मेहेंदळे ज्ञानेश्वरी वर प्रवचन करु लागल्या.
          ताईसाहेब मेहेंदळे जेव्हा आपल्या वाड्यातील दिवाणखान्यात प्रवचने देत तेव्हा दिवाणखाना श्रोत्यांनी खचाखच भरून जात असे. मोठमोठे विद्वान ही प्रवचने ऐकून माना डोलावीत. मेहेंदळे दांपत्याची शंकर महाराजांवर खुप श्रद्धा होती. महाराजही प्रवचन ऐकण्यास येत. 
          शंकर महाराजांनी कधीही कोणत्या धर्मावर किंवा ग्रंथावर टीका केली नाही. आपल्या सर्व भक्तांना अतिशय साधी शिकवण देत. ते नेहमी म्हणत, 'अरे! आचरण खुप महत्वाचे, ग्रंथांचा अभ्यास आचरणात येईल तेवढाच खरा.' 'नेहमी भावनेने भिजलेले भजन करा.' 'आपल्या कुलदेवतेची आराधना आणि मातापित्यांची सेवा करा. यापेक्षा अधिक काही नको.' असा संदेश महाराज नेहमी करत. 
          शंकर महाराज हे ऊंचीने फार कमी होते. जन्मापासून अष्टवक्र आणि अजानुबाहू होते. त्यांनी नेहमी सफेद शर्ट व धोतर परिधान केलेले असे. सदैव उत्साही आणि आनंदी चेहरा, चेहर्यावर दिव्यत्वाचे तेज. खुप वाढलेले केस. दाढी, मीशीतून डोकावणारे मोठे मोठे आणि भेदक डोळे अशी त्यांची शरीर रचना होती. कधी कधी महाराजांचे वागणे लहान मुला प्रमाणे वाटे. स्वतःला गावंढळ आणि अज्ञानी म्हणवून घेणारे महाराज जेव्हा उपदेश करीत तेव्हा मोठमोठ्या विद्वानांचा अहंकार दूर होत असे. त्यांचे तेज आणि योग सामर्थ्य चेहर्यावरुन ओसंडून वहात असे. अनेक भाषांचे ज्ञान असलेल्या महाराजांनी एकदा रशियन दांपत्यास त्यांच्या रशियन भाषेत संभाषण करून त्या दांपत्यास मार्गदर्शन केले. पुढे शंकर महाराजांनी अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरू बनवले. गुरू दिक्षा घेतली. 
          पुढे श्री गजानन महाराजांच्या आज्ञेनुसार श्री भगवंत वासुदेव अघोर शास्त्री यांनी 'श्री शंकरगीता' लिहीली. महाराजांचे चरित्र यात कथन केले आहे. महाराजांनी आपल्या अवतार काळात अनेकांना योग्य मार्गदर्शन केले. प्रसंगी चमत्कार करून भक्तांच्या मनोकामना पुर्ण केल्या. निपुत्रिकांना संतानप्राप्ती घडवून आणली. स्वतःला श्री स्वामींचे दास म्हणवून श्री स्वामी समर्थ हेच मालक आहेत असा संदेश दिला. ते भक्तांची माय माऊली झाले. 
          अशा श्री शंकर महाराजांनी पुण्यातील धनकवडी येथे २६/०४/१९४७ ला समाधी घेतली. ज्या ज्या ठिकाणी महाराजांनी दर्शन दिले तिथे आज मंदिरे आहेत. त्या सर्व ठिकाणी वैशाख शुद्ध अष्टमीला समाधी उत्सव साजरा होतो. धनकवडीतील समाधी स्थळ हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. श्री शंकर महाराज नेहमी म्हणत, 'उदबत्तीच्या आणि सिगारेटच्या धुराच्या लहरी वरून आम्ही त्रैलोक्य भटकून येतो. या धुराच्या लहरी संपुर्ण विश्वात भ्रमण करत असतात.' त्यामुळे शंकर महाराजांना सिगारेट अर्पण केली जाते. कर्नाटक राज्यातील श्री भागवत यांनी शंकर महाराजांचे चरित्र लिहिले. अशा शंकर महाराजांच्या लीलांचे थोडक्यात वर्णन करणे खुप कठीण काम आहे. या लेखाची इथं समाप्ती करून आणखी एका नव्या लेखाद्वारे पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन मी आपला निरोप घेतो. 

               श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ||

थोडे नवीन जरा जुने