श्री संत बाळूमामा

श्री संत बाळूमामा 
          श्री स्वामी समर्थ, नमस्कार स्वामी भक्तहो. आज आपण श्री दत्त गुरुंच्या आणखी एका अवतारा बद्दल जाणून घेणार आहोत. श्री संत बाळूमामा यांना श्री दत्त गुरुंचे अवतार मानले जाते.
          श्री संत बाळूमामा यांचा जन्म शके १८१४ दि. ३/१०/१८९२ मध्ये सोमवारी अश्विन शुद्ध द्वादशीला एका धनगर कुटुंबात झाला. त्यांचे जन्मस्थळ हे कर्नाटक राज्यातील, बेळगाव जिल्ह्यातील,चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळ हे गाव आहे. 
          बालपणात त्यांचे वागणे हे त्यांचे वडील श्री मायप्पा आरभावे व त्यांची आई सुंदरा यांना फार विचित्र वाटत असे. त्यांच्या वागण्यात सुधारणा व्हावी आणि व्यवहारीक ज्ञान मिळावे यासाठी त्यांना अक्कोळ इथल्या जैन व्यापारी चंदुलाल शेठजी यांच्याकडे चाकरीला ठेवले. पुढे बाळूमामा त्यांची बहीण गंगुबाई हीर्याप्पा खिलारे यांच्याकडे राहू लागले. तेव्हा त्यांचे भाचे त्यांना मामा म्हणून हाक मारत पुढे ते सार्या जगताचे बाळूमामा झाले. 
           ऐन दुपारी कडक उन्हात क्षुधा शमविण्यासाठी दोन साधू बाळूमामांकडे आले. तेव्हा बाळूमामांनी त्यांना पानी पाजून तृप्त केले. तृप्त झालेल्या साधूंनी बाळूमामांना‌ वाचासिद्धी व कार्यसिद्धीचा आशिर्वाद दिला. बाळूमामांची ईच्छा नसताना त्यांची बहीण गंगुबाई हिच्या मुलीचा, सत्वय्याचा विवाह बाळूमामांशी करण्यात आला. व कुळाप्रमाणे मेंढ्या राखत त्यांचा फिरता संसार सुरू झाला. 
          एकदा मेंढ्या चरत असताना त्यांना आकाशवाणी ऐकु आली. 'अरे बाळू... तू गुरू करून घे.' पुढे काही दिवसांनी शिवारात फिरत असताना त्यांना मुळे महाराजांची भेट घडते. तेव्हा ते बाळूमामांना म्हणतात,'तू भुते काढलीस त्यांचे १२० रूपये मला दे.' हे मुळे महाराजांचे शब्द ऐकून बाळूमामा थक्क झाले कारण बाळूमामांना नेमके तेवढेच पैसे मिळाले होते. व मुळे महाराज हेच गुरु करण्यासाठी योग्य आहेत असे मानून बाळूमामांनी दिक्षा घेतली. 
          लग्नाच्या ९ वर्षांनंतर सत्वय्या गरोदर राहिल्या. परंतु बाळूमामांच्या आज्ञेचे उल्लंघन केल्याकारणाने त्यांचा गर्भपात झाला. आणि पुढे बाळूमामांनी आपल्या पत्नीचा त्याग केला. आणि जगाचा रहाट गाडा चालवण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकात गावोगावी फिरू लागले. त्यामुळे बाळूमामांना लोक संचारी संत म्हणून ओळखु लागले. 
           संचार करीत असताना त्यांनी अनेक लोकांच्या कल्याणासाठी प्रसंगी चमत्कार केले. त्यांची पंचमहाभूतांवर सत्ता होती. या अनुभवांमुळे लोक त्यांचे भक्त बनू लागले. त्यांना ईश्वरी अवतार मानू लागले. ते भक्तांना कानडी तसेच ग्रामीण मराठी भाषेत मार्गदर्शन करीत. बाळूमामांनी दिलेल्या शिव्या भक्तांना आशिर्वादच वाटत असे. लहान थोर, गरीब श्रीमंत, विद्वान अनाडी असे सर्वप्रकारचे स्त्री पुरुष बाळूमामांचे भक्त होते. त्यांना नेहमी भाजी भाकरीचा साधा आहार आवडत असे. अंगात शर्ट, कमरेला धोतर, खांद्यावर कांबळा आणि पायात कोल्हापुरी चपला असा त्यांचा पेहराव असे. ऊन, वारा, पाऊस किंवा थंडी काहीही असो त्यांचा मुक्काम नेहमी शेळ्यांसोबत शिवारातच असे. लोकांनी भक्तिमार्गास लागून गोरगरीबांना अन्नदान मिळावे याकरिता बाळूमामांनी १९३२ सालापासून भंडारा उत्सव सुरू केला. 
             बाळूमामा हे असामान्य विभुती असुनही साधेच रहात. त्यांच्या कपड्यांना कधीच घामाची दुर्गंधी येत नसे. त्यांच्या चपला नेहमी स्वच्छ दिसत अगदी पावसातही त्यांना चिखल लागत नसे. नाटकी, ढोंगी,अनाचारी तसेच अंधश्रद्धाळू लोकांची त्यांना फार चिड येते असे. बाळूमामा नेहमी अशा लोकांचा विरोध करत. 
            आपला धनगरी पेशा सांभाळून अंतरंगाने संन्यासी जीवन जगले. कारण पत्नीचा त्याग केल्यानंतर पुन्हा विवाह केला नाही जगालाच आपला संसार मानले. लोककल्याणासाठी आपले जीवन जगले. काही काही वेळा लोकांची श्रद्धा तपासण्यासाठी ते शिव्याही देत. पण शिव्या देण्यामागे लोकांचा अहंकार गळून पडावा हाच हेतू असे. 
        ‌ पुढे वयाच्या ७४ व्या वर्षी बाळूमामांनी समाधी घेतली. समाधी घेण्याच्या दोन वर्षांपूर्वी पासूनच बाळूमामा भक्तांना सुचक शब्दात कल्पना देत होते. परंतु लोकांना त्या सुचक शब्दांचा अर्थ घावला नाही. श्रावण वद्य चतुर्थी (४ सप्टेंबर १९६६) स बाळूमामांनी निजधामास प्रयान केले. व आपल्या भक्तांचा निरोप घेतला. अशा संतश्रेष्ठ बाळूमामां बद्दल थोडक्यात वर्णन करणे खुप कठीण काम आहे. बाळूमामांना वंदन करून हा लेख इथेच संपवतो. आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर पुन्हा भेटूया आणखी एका नविन माहिती सोबत तो पर्यंत मी तुमचा निरोप घेतो नमस्कार

       ‌ श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ||


थोडे नवीन जरा जुने