श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय १७

श्री स्वामी चरीत्र सारामृत (मराठी अनुवाद) अध्याय  १७
          श्री स्वामी समर्थ, सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय सतरावा या बद्दल जाणून घेणार आहोत.
          मागील अध्यायात आपण पाहीले स्वामीसुतांनी मुंबईस येऊन श्री स्वामी समर्थांच्या मठाची स्थापना केली. आपला सुसंपन्न संसार त्यागून त्यांनी स्वतःला अष्टौप्रहर श्री स्वामी सेवेत रूजू केले. आणि आपल्या षडरिपुंवर विजय मिळवला. स्वात्मसुखी वृत्ती मध्ये सदा तल्लीन राहून त्यांनी सर्वप्रकारच्या संस्मृती हरल्या. कोणत्याही प्रकारची भीती मनात न आणता ते सदा चित्त आनंदी राहू लागले. 
           सदैव श्री स्वामी नामाच्या भजनात आणि त्यांच्या चरीत्र कीर्तनात दंग होऊन आपले जीवन धन्य केले. आपला सुसंपन्न संसार त्यागून गोसावी होऊन बसले म्हणून लोक स्वामीसुतांवर हसत होते. पण त्यांनी लोकांची कधीच पर्वा केली नाही. 
           स्वामीसुतांच्या आईंना या गोष्टींमुळे खुप दुःख झाले. पुत्र वात्सल्याने शोक करीत स्वामीसुतांच्या आई म्हणजेच काकुबाई या सुतांजवळ मुंबईस येतात. आपल्या पुत्राला गोसावी झालेले पाहून छाती पिटुन, आक्रोश करून जमीनीवर अक्षरशः लोळल्या. 
          आपल्या मातेचा शोक पाहून सुतांनी स्वतःला सावरले व काकुबाईस प्रेमाने समजावले. ते म्हणाले तुझ्या पोटी जरी माझा जन्म झाला तरी सद्गुरू चरणीच मोक्ष आहे. या त्रिभुवनी, माते मी धन्य झालो. अशा प्रकारे परमार्थाच्या गोष्टी सांगून, मधुर स्वरात मातेला समजावले. 
           त्या काळी यशवंतराव भोसेकर नावाचे प्रख्यात, थोर संत होते. त्यांना लोक देव मामलेदार म्हणूनही ओळखत होते. काकुबाईंनी त्यांना स्वामीसुतांच्या अशा वागण्या बद्दल सांगितले आणि त्यांना समजवण्यास सांगितले. तेव्हा देव मामलेदारांनी हासून उत्तर दिले की आपण या गोष्टीं करीता असमर्थ आहोत. असे उत्तर ऐकून काकुबाई दुःखी होऊन अक्कलकोटला परततात. व स्वामींना विनंती करतात की स्वामीसुतांना भजनी लावू नका. पण श्री स्वामी ती कडे दुर्लक्ष करतात. 
          इथे स्वामीसुत मुंबईत, अनेक श्री स्वामी भक्त घडवतात. त्यांनी अनेक हिंदू, पारशी आणि अनेक जातींच्या लोकांना उपदेश केले. श्री स्वामींचा मठ हा कामाठीपूर्यात असल्याने एका भक्तीनीने स्वामीसुतांना आपली जागा देऊ केली. व तिथं मठाची स्थापना केली. 
          स्वामीसुतांची अशी निस्सीम भक्ती पाहून इतर श्री स्वामी सेवक त्यांचा द्वेष करीत. कधी कधी तर स्वामीसुतांचा अपमान करण्यापर्यंत त्यांची मजल जात असे. त्यांची तारा नावाची पुर्वीची पत्नी तीही त्यांना त्रास देत असे. पण स्वामीसुतांनी याबद्दल कधीही दुःख खेद केला नाही. 
          स्वामीसुतांनी सर्वात प्रथम शके सतराशे त्र्यान्नवात, फाल्गुन त्रयोदशीस श्री स्वामी जयंती साजरी करण्यास सुरुवात केली. त्या वेळी नगरकर नाना जोशी नावाचे एक रेखी (ज्योतिष) स्वामीसुतांचा महीमा ऐकून मुंबईस आले होते. तेव्हा स्वामीसुतांनी जोश्यांना श्री स्वामींची पत्रिका बनवून श्री स्वामींच्या चरणी अर्पण करण्यास सांगितले.‌ 
          स्वामीसुतांसमवेत जोशीही श्री स्वामी भक्तीत लीन झाले. असे अनेक शिष्य स्वामीसुतांनी घडवले. काही दिवसांनी जोशी बुवांनी पत्रिका बनवून श्री स्वामींच्या चरणी वाहण्यास अक्कलकोटला आले. 
        पत्रिका पाहून श्री स्वामींना खूप आनंद होतो. व श्री स्वामीं जोश्यांना नगारा वाजवण्यास सांगतात. आपल्या सारख्या भक्ताला आज्ञा केली म्हणून जोश्यांना परमानंद होतो. पत्रिकेत श्री स्वामींच्या अवतरल्या बद्दल ची हकीकत जोश्यांनी मांडली होती. छेली‌ नावाच्या गावात म्हणजेच पंजाब मध्ये श्री स्वामी प्रथम प्रकटले. या बद्दल भक्तांमध्ये दूमत आहे पण सर्व काही श्री स्वामी जाणतात. आणि हाच दिवस श्री स्वामींची जयंती करण्यास योग्य आहे असे स्वामीसुत म्हणतात. 
          एकदा श्री स्वामी समर्थ राजवाड्यात असताना, स्वामीसुत श्रींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला येतात. आणि त्यावेळी गुरुवार खेरीज पुरुषांना, दर्शनासाठी राजवाड्यात बंदी असे. श्री स्वामी दर्शन घेतल्याशिवाय अन्न पाण्याला तोंड लावणार नाही असा संकल्प स्वामीसुत करतात. असेच निराहार, तीन दिवस पालटतात. 
           श्री स्वामींच्या दर्शनेच्या लालसेने स्वामीसुत वाड्यासमोर जाऊन प्रेमळ भजनाला सुरूवात करतात. हे करूणरसाने भरलेले भजन राणी आतून ऐकते. आणि शिपायांना आज्ञा करते की यापुढे स्वामीसुतांना राजवाड्यात येण्यास रोखायचे नाही. आणि सन्मानपूर्वक शिपाई स्वामीसुतांना‌ मंदिरात घेऊन येतात. आणि स्वामीसुत धावत जावून श्री चरणांना प्रेमाश्रूंनी अभिषेक करतात. नीजसुताला पाहून श्री स्वामींनाही आनंद होतो. 
          स्वामीसुतांवर काही सेवेकर्यांचा द्वेष होताच. एक दिवस ते श्री स्वामी भजनात इतके तल्लीन झाले की त्यांना भानच राहिले नाही की आपण श्री स्वामींपुढे पायात खडावा घालून नाचत आहोत. हे पाहून काही सेवेकरी स्वामीसुतांवर तूटून पडले. आणि त्यांच्या पायातील खडावा फेकून दिल्या. श्री स्वामी परके आणि निजसुत यांमध्ये भेद करत नव्हते, त्यामुळे श्री स्वामी त्यांना खडावा घालायला नको ‌होत्या असे म्हणतात. 
          त्यामुळे स्वामीसुत मनातून दुखावला जातो. आणि अक्कलकोट हून तडक ते मुंबईला येतात. श्री स्वामी त्यांना थांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात पण ते ऐकत नाहीत. स्वामीसुत मनातून पार खचतात आणि अशातच फार आजारी पडतात. हा समाचार श्री स्वामींच्या कानी पडतो. 
          तेव्हा श्री स्वामी सेवकांना आज्ञा करतात की कुणी तरी सुताला इथं आणा, नाही येत असेल तर पेटीत घालून आणा. पण, अक्कलकोटात अपमान झाल्याने ते पुन्हा अक्कलकोटला कधीच परतले नाहीत. पुन्हा श्री स्वामींनी सुतास परत आणण्यासाठी मानसं पाठवली. परंतु स्वामीसुत काही आला नाही. शेवटी श्री स्वामींनी निरोप पाठविला की तू जर आला नाहीस तर तोफ लावून झोपडी उडवून देईन. पण जीवीत पर्वा न करता ते अक्कलकोटला परतले नाहीत. 
          आणि श्री स्वामींनी अचानक लीला करण्यास सुरुवात केली. त्यांनी स्नान केले पण गंध लावला नाही. भोजन केले नाही. कोणाशी बोलेनासे झाले. धरनीवर लोळून मधेच हुंदके देऊ लागले. कुणाला काहीच कळत नव्हते श्री स्वामी असे का करत आहेत. आणि मुंबईहून समाचार येतो की स्वामीसुत मरण पावले. आणि त्या दिवशी संपूर्ण नगरात उदासीनता पसरते. 
          आपल्या पुत्राची मरण‌वार्ता ऐकून काकुबाई मुंबईस पोहोचतात. आणि मग अक्कलकोटास येतात. आणि श्री स्वामींना पुत्रशोक करून प्रश्न विचारतात की, सुत तुमचा पुत्र असून तो असा अकाली का मरण पावला? तुम्ही त्याला वाचवू शकला नाहीत तर इतरांचे कसे तारण होणार. तेव्हा श्री स्वामी म्हणतात आम्ही त्याला‌ परत येण्याची खुप विनवनी केली पण त्याने आज्ञेचे उल्लंघन केले आणि काळाने ही‌ संधी साधून त्याला ओढून नेला. स्वामीसुत किती श्रेष्ठ होता हे सांगून श्री स्वामी काकुबाईचे सांत्वन करतात. 
          पुढे स्वामीसुताची मुंबईची गादी रिकामी झाली. आता त्या गादीचा अधिकारी कोण असेल असे प्रश्न सेवकरी श्री स्वामींना करु लागले. अशाप्रकारे ग्रंथकाराने श्री स्वामीसुतांच्या जीवन चरित्राचे कथन केले आहे. आणि इथेच श्री स्वामी चरीत्र सारामृताच्या सतराव्या अध्यायाची समाप्ती होते. आणि हा अध्याय सर्व अध्यायां पैकी सर्वश्रेष्ठ आणि सर्वात मोठा अध्याय असल्याची खात्री ग्रंथ रचियेते देतात.
                  श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ||

          थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना श्री स्वामी समर्थ||

थोडे नवीन जरा जुने