श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय ९

श्री स्वामी चरीत्र सारामृत (मराठी अनुवाद) अध्याय  ९
          श्री स्वामी समर्थ, सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय नववा या बद्दल जाणून घेणार आहोत.
          या अध्यायात आपण पाहणार आहोत की, शंकरराव राजेराय बहाद्दूर हे आपल्या प्रिय पत्नी सहीत अक्कलकोटला येऊन पोहोचतात.
          अक्कलकोट येथे अनेक ठिकाणांहून, अनेक भक्त आपले मनोरथ पूर्ण व्हावे यासाठी श्री स्वामींच्या दर्शनासाठी येत असत. ब्राह्मणादी चारही वर्णाचे लोक तसेच पारशी, यवन आदी विविध धर्माचे भक्त श्री स्वामींच्या दर्शनार्थ येत असत. त्यामुळे श्री स्वामी स्थानाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झालेले असे. 
          येथील अशा‌ गर्दीमध्ये आपल्याला श्री स्वामींचे दर्शन कसे घडेल या विवंचनेत असताना, शंकररावांची भेट मठाची मुख्य सेविका सुंदरा बाई यांच्याशी होते.
          सुंदरा बाई या फार लोभी वृत्तीच्या होत्या. परंतु पुर्व पुण्याई मुळेच त्या स्वामी सेवेत होत्या. श्री स्वामींच्या जवळ होत्या. शंकररावांनी आपली व्यथा सुंदरा बाईं जवळ मांडली. व श्री स्वामींची भेट घडवून आणण्या बद्दल प्रार्थना केली. 
          शंकरराव हे फार मोठे आसामी आहेत हे सुंदरा बाईंना समजताच त्यांच्या मनात लोभ उत्पन्न झाला. व व्याधीतून मुक्त झाल्यावर दोन हजार रूपये द्याल, असे वचन सुंदरा बाईंनी शंकररावांकडून मागितले. पण शंकररावांनी दहा हजार रूपये देण्याचे कबूल करून संकल्प सोडला. 
          शंकररावांनी सांगितल्या नुसार त्यांची भेट श्री स्वामींशी झाली. त्यावेळी श्री स्वामी शेख नुर बाबांच्या दर्ग्यात होते. सुंदरा बाईंनी श्री स्वामींना शंकररावांची ब्रह्म समंधाची बाधा दूर करण्यासाठी विनंती करताक्षणी, श्री स्वामी उठले आणि नुकत्याच खोदलेल्या कबरीत छाटि टाकून निजले. तेव्हा एका सेवेकर्याने शंकररावांना सांगितले की, श्री स्वामींनी लीला करून तुमचे मरण चुकवले. 
          श्री स्वामींनी शंकररावांना कडु लिंबाच्या पाल्यामध्ये दहा मिरे वाटून, ते औषध नियमीत घेण्यास सांगितले व तुझी समंध बाधा दूर होईल असे सांगितले. तेव्हा शंकररावांनी तेथील फकिरांना आणि जनतेला अन्नदान केले. व शेख नुर साहेबांना एक कफनी चढवली. 
          काही दिवसातच शंकररावांची समंध बाधा आणि व्याधीतून मुक्तता झाली. पुढे काही काळानंतर शंकरराव श्री स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आले. व श्री स्वामींना आपल्या व्याधीतून मुक्तता झाल्यानंतर दहा हजार रूपये देण्याच्या संकल्पा बद्दल सांगितले. 
          तेव्हा सुंदरा बाईस पैसे देऊ नये असे श्री स्वामींनी शंकररावांना सांगितले. त्या पैशातूनच गावाबाहेर एक चुनेगच्ची मठ भक्तांच्या संगनमताने बांध. अशी आज्ञा शंकररावांना श्री स्वामींनी दिली. हाच मठ आज राजेराय मठ म्हणून अक्कलकोटात प्रसिद्ध आहे. 
          आणि इथेच श्री स्वामी चरीत्र सारामृताच्या नवव्या अध्यायाची समाप्ती होते.
                श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.

          
         थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना श्री स्वामी समर्थ||

थोडे नवीन जरा जुने